Delhi Red Fort explosion: राजधानी दिल्लीमधील लाल किल्ल्यालगत असलेल्या मेट्रो स्थानकाजवळ उभ्या केलेल्या एका कारमध्ये स्फोट झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली. या स्फोटामुळे आजूबाजूला उभ्या असलेल्या गाड्यांनी पेट घेतला. अचानक झालेल्या स्फोटामुळे परिसरात घबराट पसरली. या घटनेत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सोमवारी सायंकाळी ६.५५ वाजता स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर तिथे कशी परिस्थिती होती? याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
माध्यमांशी बोलत असताना एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, स्फोट इतका तीव्र होता की, मला जमीन कोसळल्यासारखे वाटले. मी आता मरतो की काय, अशी भीती माझ्या मनात आली. स्फोट इतका जोरदार होता की, रस्त्यावरील दिवे फुटले आणि आग लागल्यामुळे अनेक गाड्यांचे नुकसान झाले.
प्रत्यक्षदर्शी पुढे म्हणाला, “इथे जवळच माझे दुकान आहे. सायंकाळी अचानक स्फोट झाल्याचा आवाज आला. मी माझ्या जीवनात इतका जोरदार आवाज कधीच ऐकला नव्हता. मी बसल्या जागी खुर्चीवरून खाली पडलो. उठल्यानंतर मी पुन्हा दोनदा खाली पडलो. मला वाटले जमीनच फाटली की काय. मी दुकान सोडून पळालो. माझ्याबरोबर इतरही लोक पळत सुटले. पळताना अनेकजण एकमेकांच्या अंगावर पडत होते. आम्हाला वाटले की, आणखी एक स्फोट झाला तर आम्ही इथेच मरू.”
“मृत्यूला आम्ही आज जवळून पाहिले. थोडे पुढे गेल्यानंतर माझ्या मित्रांनी मला कोल्ड्रिंक पाजले आणि मी भानावर आलो. त्यानंतर थोड्या वेळाने मी पुन्हा दुकानाकडे आलो आणि दुकानाला टाळे ठोकून आता घरी जात आहे”, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली.
दुसऱ्या एका व्यक्तीने सांगितले, “मी घराच्या छतावर असताना मला दूरवर स्फोटाचा आवाज ऐकू आला. मी जेव्हा तिकडे पाहिले तेव्हा जमिनीवरून प्रचंड आगीचे लोळ वर आलेले दिसले. नेमके काय झाले? हे पाहण्यासाठी मी खाली धावलो. स्फोट इतका जोरदार होता की, माझ्या घराच्या खिडक्याही जोरात हादरल्या.”
स्फोटाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. दोन दिवसांपासून देशभरात बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड देशात विविध राज्यात करण्यात आला आहे. गुजरातच्या अहमदाबाद येथे स्फोटकांसह काही जणांची अटकही झाली आहे. तसेच स्फोटके बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अमोनियम नायट्रेटचे हजारो किलोंचे साठे जप्त करण्यात आले आहेत.
#WATCH | Delhi: Blast near Red Fort | "When we saw someone's hand on the road, we were absolutely shocked. I can't explain it in words…" said a local to ANI pic.twitter.com/vmibMbPFUk
— ANI (@ANI) November 10, 2025
या घडामोडींनंतर लाल किल्ल्याजवळचा स्फोट घडला आहे. त्यामुळे आता या घटनांचा गांभीर्याने तपास होत आहे.
