दिल्ली काँग्रेस अध्यक्ष अरविंदसिंह लवली यांनी प्रचारात वेळ मिळावा यासाठी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. अजय माकन यांना काँग्रेस प्रचारप्रमुख केल्याने लवली नाराज असल्याची चर्चा होती. त्यातून त्यांनी माघार घेतल्याचे मानले जात होते. काँग्रेसने मात्र नाराजीचे वृत्त फेटाळले.
गांधीनगर विधानसभा मतदारसंघ हे लवली यांचे प्रभावक्षेत्र मानले जाते. निवडणूक रिंगणातून माघार घेण्याची सूचना पक्षाने लवली यांना केल्याचे दिल्लीचे काँग्रेस प्रभारी पी. सी. चाको यांनी स्पष्ट केले. लवली यांच्या जागी नव्या उमेदवाराची घोषणा सोमवारी केली जाईल. विशेष म्हणजे काँग्रेसने आपल्या पहिल्याच यादीत लवली यांच्या नावाची घोषणा केली होती. लवली यांनी स्वत:हून माघार घेतल्याच्या वृत्ताचे चाको यांनी खंडन केले. हा त्यांचा नव्हे तर पक्षाचा निर्णय आहे. लवली यांना संघटनात्मक जबाबदारी सांभाळण्यास सांगण्यात आल्याचे चाको यांनी सांगितले.
 पक्षाचे सरचिटणीस असलेल्या अजय माकन यांना प्रचारप्रमुख केल्याने लवली यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याचे मानले जात होते.
मात्र दिल्लीच्या राजकारणात लवली व हरून युसूफ यांच्यासह गेली दहा ते पंधरा वर्षे काम करत आहोत, असे माकन यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नाराजीचा प्रश्न नसल्याचे माकन यांनी सांगितले.