दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लब येथे जेएनयूचा माजी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद याच्यावर सोमवारी सकाळी अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या गोळीबारातून उमर खालिद हा बचावला आहे. हा उमर खलिद आहे तरी कोण, त्याच्याशी संबंधित वाद याचा घेतलेला हा आढावा..

उमर खालिद चर्चेत कसा आला?
२०१६ मध्ये संसद हल्ल्यातील दोषी अफझल गुरू याच्यासंदर्भात विद्यापीठ परिसरात झालेल्या कार्यक्रमात देशविरोधी नारे देण्यात आल्याचे समोर आले. या कार्यक्रमाचे आयोजन केल्याप्रकरणी जेएनयूतील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अन्य मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सर्वांची जामिनावर सुटका झाली असली तरी उमर खालिद तेव्हापासूनच देशभरात चर्चेचा विषय ठरला.

उमर खलिदची कौटुंबिक पार्श्वभूमी
खलिदचा परिवार ३ दशकांपूर्वी महाराष्ट्रातील अमरावतीमधून दिल्ली येथे स्थानिक झाला. उमर खलिद हा झाकिरनगर परिसरात राहायचा. त्याचे वडील हे उर्दु मासिक चालवायचे.

उमर खालिदचे शिक्षण किती?

जेएनयूतील समाजशास्त्र विभागातून उमर खालिदने इतिहास या विषयात एमए आणि एम- फिल केले आहे. सध्या तो जेएनयूतून पीएचडी करत आहे. काही दिवसांपूर्वी जेएनयूने उमर खलिदने पीएचडीसाठी सादर केलेले प्रबंध स्वीकारण्यास नकार दिला होता.

उमर खलिद आणि वाद?
उमर खलिद याने मोदी सरकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर वेळोवेळी बोचरी टीका केली आहे. तसेच जेएनयूत हिंदू देवी- देवतांचे आक्षेपार्ह चित्र लावून तेढ निर्माण केल्याचा आरोप खलिदवर झाला होता. तसेच अफझल गुरुला फाशी देण्यात आली त्या दिवशी जेएनयूत शोकसभा झाली होती. यातही खलिद सहभागी झाल्याचे सांगितले जाते. याशिवाय खलिदने वेळोवेळी काश्मीरला स्वातंत्र्य देण्याची मागणी केली आहे.