Demand For Cockpit Video Recorders After Air India Plane Crash: गेल्या महिन्यात १२ जून रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या बोईंग ७८७-८ विमानाचा उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांतच अपघात झाला होता. यामध्ये २६० जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ऑफ इंडियाने अपघाताच्या एक महिन्यानंतर एक अंतरिम अहवाल सादर केला आहे.
या अहवालात एअर इंडियाच्या बोईंग ७८७-८ विमानाच्या अपघातापूर्वी दोन वैमानिकांमध्ये झालेल्या संवादाचा खुलासा करण्यात आला आहे. या संवादादरम्यान एक वैमानिक दुसऱ्या वैमानिकाला म्हणतो की, “तू फ्युअल का बंद केलं?”, यावर तो म्हणतो, “मी फ्युअल बंद केलं नाही.” हे संभाषण फ्लाइट ऑडिओ रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड झालं आहे.
या अहवालामुळे अपघाताबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले असून कॉकपिट व्हिडिओ रेकॉर्डरची मागणीही वाढली आहे. जेव्हा गंभीर घटनांचे व्हिडिओमुळे अचूक उत्तरं मिळू शकतात, तेव्हा फक्त ऑडिओवर अवलंबून का राहायचं, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
भारतासह परदेशातील लोकही असा प्रश्न उपस्थित करत आहेत की, ज्या विमानांमध्ये इतक्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक सुविधा असतात, त्यांच्या कॉकपिटमध्ये कॅमेरे का असू शकत नाहीत, जे गंभीर परिस्थितीत घेतलेल्या निर्णयांचं आणि केलेल्या कृतींचं रेकॉर्डिंग करू शकतात?
सध्याच्या वायरिंगमुळे आणि विमाने सरासरी एक दशक जुनी असल्याने कॅमेरे असलेले रेट्रो-फिटिंग कॉकपिट थोडे आव्हानात्मक असू शकतात, परंतु नवीन विमानांमध्ये कॅमेरे बसवणं कठीण नाही. हवाई अपघातांची चौकशी करणारी स्वतंत्र अमेरिकन सरकारी संस्था, नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डने जवळजवळ २५ वर्षांपूर्वी कॉकपिट व्हिडिओ रेकॉर्डरची मागणी केली होती.
वैमानिकांचा आक्षेप
दरम्यान, कॉकपिट व्हिडिओ रेकॉर्डर बसवण्यासाठी सर्वात मोठा अडथळा म्हणजे स्वतः वैमानिक आहेत. त्यांचा युक्तिवाद आहे की, कॉकपिटमधील फुटेजमुळे त्यांच्या गोपनीयतेचं उल्लंघन होईल. याचबरोबर, उच्च तणावाच्या परिस्थितीत वैमानिक बेफिकीरपणे वागतात, तसेच ज्युनिअर वैमानिक वरिष्ठांच्या निरीक्षणांवर आणि निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात त्यामुळे अशा संस्कृतीला हानी पोहोचेल. वैमानिकांना अशीही भीती आहे की, एअरलाइन कंपन्या त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठीही कॅमेरे वापरू शकतात.
कॉकपिट व्हिडिओ रेकॉर्डरवर वैमानिकांचा दुसरा आक्षेप असा आहे की, त्यांना गंभीर परिस्थितीत अशा काही गोष्टी कराव्या लागतात ज्या नियमांच्या विरुद्ध असतात आणि त्यामुळे त्यांच्या हालचाली कॅमेऱ्यात रेकॉर्ड होतील.