नोटाबंदीवरुन बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा प्रहार केला आहे. राजकीय फायदा केंद्रस्थानी ठेवून मोदी सरकारने जुन्या नोटा चलनातून हद्दपाल केल्याचा आरोप मायावतींनी शनिवारी केला. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा व्यवहारातून हद्दपार करुन सरकारने देशात आणीबाणी आणली आहे. या निर्णयामुळे सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत असल्याचे मायावती यावेळी म्हणाल्या. हिंमत असेल तर लोकसभा बरखास्त करा आणि पुन्हा निवडणुका घ्या, असे आव्हान मायावतींनी यापूर्वी मोदींना केले होते. नोटाबंदीच्या निर्णयावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी गोंधळही घातल्याचे पाहायला मिळाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात येऊन नोटाबंदीच्या निर्णयावर उत्तर द्यावे, अशी मागणी विरोधकांनी केली होती.

विरोधक नोटा बंदीला विरोध करत असताना, नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीवरुन जनतेचे मत जाणून घेण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी मोदींच्या अॅपवर मते मागविण्यात आली आहेत. मोदींच्या या निर्णयावर देखील मायावती यांनी मोदींवर टीका केली होती. नोटाबंदीवर जनमत जाणून घेण्यासाठी सुरू करण्यात आलेले अॅप बनावट असल्याचे त्यांनी म्हटले होते.  या अॅपच्या माध्यमातून पाच लाखहून अधिक लोकांनी आपली मते नोंदविली आहेत. यामध्ये ९३ टक्के जनतेने नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केल्याचा दावा सरकारने केला आहे.

भ्रष्टाचार व काळ्या पैशाविरोधात लढाई आवश्यक असल्याचे मत ९९ टक्के लोकांनी नोंदवले आहे. ९० टक्के लोकांनी सरकारने काळा पैसा रोखण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. ९२ टक्के लोकांनी भ्रष्टाचारविरोधात मोदी सरकारचे प्रयत्न योग्य असल्याचे म्हटले आहे. ९० टक्के लोकांनी ५०० व १००० रूपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. तर ९२ टक्के लोकांच्या मते या निर्णयामुळे काळे धन, भ्रष्टाचार आणि दहशतवादावर लगाम लावण्यास मदत मिळेल असे म्हटले आहे. या सर्वेक्षणात ५०० व १००० रूपयांच्या जुन्या नोटा बंद करण्यासंबंधीचे प्रश्न विचारण्यात आले होते.