‘नोटाबंदी’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला आर्थिक विनाश असल्याची खरमरीत टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. या कृतीद्वारे मोदी सरकारने लोकांचा विश्वास गमावल्याचेही ते म्हणाले. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सरकारवर विविध मुद्द्यांवरून हल्लाबोल केला.


राहुल गांधी म्हणाले, ‘देशात आज सर्वांत मोठा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून सरकार बेरोजगारांची फौज तयार करीत आहे. देशातील सर्वच पैसा हा ‘काळा पैसा’ नाही, ‘नोटाबंदी’ आणि ‘जीएसटी’ने आपल्या अर्थव्यवस्थेला अपंग बनवले आहे. ‘जीएसटी’ हा कर दहशतवादाची सुनामी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मोदी सरकार देशातील छोट्या आणि मध्यम उद्योगांचा सन्मान का करीत नाही?’ असा सवाल त्यांनी यावेळी केला.


ताजमहालवरुन देशात सुरु असलेल्या वादावर यावेळी राहुल गांधी यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘ताजमहाल कोणी बांधला यामध्ये आपण अडकल्याने आज जग आपल्यावर हसत आहे.’ अर्थमंत्री अरुण जेटलींवर टीका करताना ते म्हणाले, ‘जेटली मोठे हिम्मतवाले आहेत, कारण आपला व्यवसाय पार बुडत चाललाय तरी ते टीव्हीवर सर्वकाही ठिक असल्याचे सांगत आहेत.’


पीएचडी चेंबर्स ऑफ कॉमर्समध्ये राहुल गांधींनी काही वैयक्तिक प्रश्नांनाही उत्तरे दिली. त्यांना एकाने लग्नाबाबत प्रश्न विचारल्यानंतर, माझा नशीबावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे माझे लग्न होईल तेव्हा होईल, असे उत्तर त्यांनी दिले. गुजरातच्या निवडणुका जवळ यायला लागल्या तसा राहुल गांधी यांचा आक्रमकपणा आता वाढायला लागला आहे. विविध मुद्द्यांवरुन सरकारला घेरताना ते दिसत आहेत.