अयोध्येत जमणार दोन लाख रामभक्त, लष्कर तैनातीची मागणी

उत्तर प्रदेशात खासकरुन अयोध्येत जे वातावरण आहे सर्वोच्च न्यायालयाने त्याची दखल घेऊन गरज असेल तर लष्कराला तैनात करावे अशी मागणी अखिलेश यादव यांनी केली आहे. 

देशात सध्या थंडीचा मोसम सुरु असला तरी अयोध्येत मात्र राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अयोध्येच्या वातावरणातील तणाव लक्षात घेऊन उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी अयोध्येत लष्कर तैनात करण्याची मागणी केली आहे. भाजपाचा सर्वोच्च न्यायालय किंवा संविधानावर विश्वास नाहीय. भाजपा कोणत्याही थराला जाऊ शकतो. उत्तर प्रदेशात खासकरुन अयोध्येत जे वातावरण आहे सर्वोच्च न्यायालयाने त्याची दखल घेऊन गरज असेल तर लष्कराला तैनात करावे अशी मागणी अखिलेश यादव यांनी केली आहे.

अयोध्येत येत्या रविवारी विश्व हिंदू परिषदेची धर्म सभा तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठया संख्येने अयोध्येत जमा होणार आहेत. राम मंदिराचे जलदगतीने निर्माण व्हावे यासाठी विहिपने धर्मसभा बोलावली आहे. या कार्यक्रमात राज्यभरातून जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे यासाठी आयोजकांनी बस, ट्रेन, ट्रॅक्टर ट्रॉली आणि टॅक्स्या बुक केल्या आहेत. रविवारचा धर्मसभेचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघही कंबर कसून कामाला लागला आहे.

अयोध्येचा २०० किलोमीटरचा परिसर १००० भागांमध्ये विभागण्यात आला असून हिंदुंना संघटित करण्यासाठी दारोदार प्रचार, बाईक रॅली आणि मिरवणुका सुरु आहेत. अयोध्येत येत्या रविवारी जवळपास २ लाख लोक गोळा होतील असा पोलिसांचा अंदाज आहे. उत्तर प्रदेश सरकारही अलर्टवर असून अयोध्येत मोठया प्रमाणावर सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अयोध्येला एका किल्ल्याचे स्वरुप आले आहे. अयोध्येत राम भक्त येऊन धार्मिक विधी करु शकतात असे एकाबाजूला सरकार सांगत आहे त्याचवेळी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला प्रचंड सर्तकता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वादग्रस्त जागेवर सद्य स्थिती कायम रहावी. कुठल्याही प्रकारचे उल्लंघन होऊ नये असे स्पष्ट आदेश सरकारने दिले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Deploy army in ayodhya akhilesh yadav

ताज्या बातम्या