हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुच्छेद ३७० आणि कर्तारपूर मार्गिकेच्या प्रश्नांवरून विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. काँग्रेसची चुकीची धोरणे आणि रणनीती यामुळे देशाचा विनाश केल्याचे या वेळी मोदी म्हणाले.

अनुच्छेद ३७० चा मुद्दा उपस्थित करताना मोदी म्हणाले की, ही तात्पुरती तरतूद होती, मात्र ती ७० वर्षे कायम राहिली आणि काँग्रेसने त्याबाबत काहीही केले नाही. दिल्लीतील सरकार झोपेत असल्याने काश्मीरमधील स्थिती बिघडली. काँग्रेसची चुकीची धोरणे आणि रणनीती यामुळे देशाचा विनाश झाला, असेही पंतप्रधान म्हणाले. मात्र आता देश बदलला आहे, वेळ बदलली आहे, आता भारतीय आणि काश्मीरमधील जनता धोरणे ठरवतील, गेल्या ७० वर्षांत निष्पाप नागरिक, जवान बळी पडले तरीही काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात आले नाहीत, असेही ते म्हणाले. कर्तारपूर मार्गिकेबाबत मोदी म्हणाले की, मार्गिकेचे काम जवळपास पूर्ण झाले असून केंद्र सरकार गुरू नानक यांच्या ५५० व्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी व्यवस्था करीत आहे. फाळणीच्या वेळी कर्तारपूर गुरुद्वारा भारतीय हद्दीत आणता आले नाही ही मोठी चूक होती, भक्त आपल्या गुरूपासून विभक्त होऊ नयेत याची खातरजमा करण्यासाठी काँग्रेसने प्रयत्नच केले नाहीत, असेही मोदी म्हणाले.

पाकिस्तानचा अंतर्गत भाग काँग्रेसमुळेच विभक्त – सिब्बल

नवी दिल्ली : राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजप अनुच्छेद ३७०चा मुद्दा उपस्थित करीत असल्याचा आरोप शनिवारी काँग्रेसने केला. काँग्रेस पक्षामुळेच पाकिस्तानचा अंतर्गत भाग त्यांच्यापासून वेगळा झाला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला सांगितलेच पाहिजे, असेही काँग्रेसने म्हटले आहे. मोदी यांना केवळ अनुच्छेद ३७०चेच स्मरण आहे. पाकिस्तानचा अंतर्गत भाग त्यांच्यापासून कधी वेगळा झाला आणि तो कोणी केला हे मोदींना माहिती नाही, काँग्रेसनेच पाकिस्तानचा अंतर्गत भाग त्यांच्यापासून वेगळा केला, तेव्हा मोदी तुम्ही कोठे होतात, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केला.