Devendra Fadnavis : दिल्लीतल्या जेएनयू या ठिकाणी म्हणजेच जवाहरलाल नेहरु विद्यापीठात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज सामरिक अध्ययन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी भाषा अध्ययन केंद्र यांची कोनशिला ठेवण्यात आली. या कार्यक्रमानंतर झालेल्या भाषणात मराठी भाषेचं महत्त्व देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या खास शैलीत सांगितलं. भाषा संवादाचं माध्यम असतं वादाचं नाही हा मुद्दा त्यांनी आवर्जून आपल्या भाषणात मांडला.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“मराठी भाषा ही आपली अभिजात भाषा आहे. या संदर्भातले पुरावे सादर झाले तेव्हा कळलं की देशातल्या प्राचीन भाषांपैकी मराठी भाषा आहे. आपल्या मराठी भाषेला पंतप्रधान मोदींनी अभिजात भाषेचा दर्जा दिला. मराठी कायमच अभिजात भाषा होती. त्यावर राजमुद्रा लागणं महत्त्वाचं असतं. ते काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.”
भाषा हे संवादाचं माध्यम आहे वादाचं नाही-फडणवीस
“मराठी भाषेने संपूर्ण भारताला समृद्ध केलं आहे. मराठी साहित्य उत्तम आहे, मराठी नाट्यसृष्टी ही देशातली सर्वोत्तम आहे. देशात थिएटर कुठल्या एका भाषेने टिकवलंच नाही तर समृद्ध केलं तर ती मराठी भाषा आहे. अशा या मराठी भाषेवर सगळीकडे आणि सगळ्या विद्यापीठांमध्ये संशोधन झालं पाहिजे. भाषा हे संवादाचं माध्यम आहे ते वादाचं माध्यम होऊच शकत नाही. भाषेच्या माध्यमातून ज्ञानाचा खजिना आपल्यापर्यंत पोहचतो. मातृभाषा महत्त्वाची आहेच, प्रत्येक मराठी माणसाला मराठी अभिमान, स्वाभिमान आणि आग्रह आहे तो स्वाभाविकच आहे. मातृभाषेचा अभिमान असलाच पाहिजे पण इतरही भारतीय भाषांचा अभिमान आम्ही बाळगला पाहिजे, हेदेखील अत्यंत महत्त्वाचं आहे. भारतीय भाषांचा तिरस्कार करतो आणि इंग्रजीला पायघड्या घालतो त्यावेळी कुठेतरी दुःख होतं.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मराठी आणि हिंदी हा वादच नाही, मराठी भाषेसह इतर भारतीय भाषा आल्या पाहिजेत-फडणवीस
देवेंद्र फडणवीस भाषणात पुढे म्हणाले, “मला वाटतं की आपला वाद हा मराठी की हिंदी असा नाहीच. मराठी आहेच, मराठीला पर्यायच नाही. पण मराठीसोबत भारतीय भाषाही महत्त्वाच्या आहेत. मराठी आलीच पाहिजे आणि इतर भारतीय भाषा आल्या पाहिजेत. तमिळ भाषा देखील समृद्ध भाषा आहे. कुठल्याही भारतीय भाषेचा अभिमान वाटला पाहिजे. मातृभाषेचा सार्थ अभिमान असलाच पाहिजे. मी नेहमी असं म्हणतो मराठी माणूस संकुचित विचार करु शकत नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला संकुचित विचार करायला शिकवलेलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी जे पसायदान मागितलं ते संपूर्ण विश्वाकरिता मागितलं. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पानिपतची लढाई ही काही मराठ्यांची लढाई नव्हती-फडणवीस
पानिपतची लढाई ही मराठ्यांची लढाई नव्हती. मराठ्यांनी अंग काढून घेतलं असतं तरीही त्यांना कुणी काही म्हणालं नसतं. या ठिकाणच्या बादशहाने मराठ्यांकडे मदत मागितली, अहमद शाह अब्दाली आला आहे तुम्ही त्याला थांबवण्याचा प्रयत्न करा. मराठ्यांनी ते शिवधनुष्य पेलायचं ठरवलं. मराठ्यांनी अब्दालीला यमुनेच्या पार नेलं. यमुनेपार जाऊन त्या ठिकाणी अब्दालीने मराठ्यांना पत्र लिहिलं की मला तुमच्याशी तह करायचा आहे. काय तह तर तेव्हाचा पूर्ण पंजाब, सिंध आणि बलुचिस्तान हे तीन प्रांत माझे आहेत हे तुम्ही मान्य करा. उरलेला संपूर्ण भारत मराठ्यांचा आहे हे मी मान्य करायला तयार आहे. मराठे स्वतःकरता नाही तर देव देश आणि धर्मासाठी लढत होते. त्यामुळे त्यांनी हा तह झुगारुन लावला. एक इंच जमीन मिळणार नाही हे अब्दालीला सांगितलं. पानिपतच्या लढाईत मराठ्यांचं अतोनात नुकसान झालं. पण पुढच्या दहा वर्षांत शिंदेंनी दिल्लीत मराठ्यांचा झेंडा फडकावला हा इतिहास आहे. देशासाठी लढणारा मराठी माणूस संकुचित विचार करु शकत नाही. ज्या राजधानीला वाचवण्यासाठी मराठ्यांनी बलिदान दिलं त्या ठिकाणी हे कुसुमाग्रजांच्या नावाने केंद्र तयार होतं आहे ही आनंदाची बाब आहे.” असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.