देशावासियांचं ५०० वर्षांचं स्वप्न सोमवारी ( २२ जानेवारी ) पूर्ण झालं आणि रामलल्ला अयोध्येतील मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. प्राणप्रतिष्ठेनंतर श्री राम मंदिरात भाविकांना रामलल्लांचं दर्शन घेण्यात येणार आहे. त्याचपार्श्वभूमीवर भाविकांनी श्री राम मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
मंगळवारी ( २३ जानेवारी ) सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच-लांब रांगा लागल्या आहेत. सोमवारी रात्री उशिरानंतर मंदिराच्या बाहेर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. भक्तांमध्ये उत्सहाचं वातावरण असून ‘जय श्री राम’च्या घोषणा देण्यात येत आहेत. देशातील भक्तांसह स्थानिक रहिवाशीही रामलल्लांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत.
श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या २ आठवडेआधी अयोध्येतील सगळ्या हॉटेल्सची बुकिंग ८० टक्क्यांनी वाढली आहे. हॉटेलमध्ये एक दिवस राहण्यासाठी पाच टक्के अधिक पैसे द्यावे लागत आहेत. काही लग्जरी खोल्यांच्या किंमती १ लाखापर्यंत गेल्या आहेत. हॉटेलच्या किंमती वाढल्या असतानाही बुकिंगमध्ये प्रत्येक दिवशी वाढ होत आहे.
दरम्यान, २२ जानेवारी ही केवळ तारीख नाही, तर ही नव्या कालचक्राची सुरूवात ठरणार आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केलं. “रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा ही एक नव्या युगाची सुरूवात असून पुढील एक हजार वर्षे कणखर आणि पवित्र भारताची पायाभरणी करण्यासाठी सज्ज व्हा,” असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. यावेळी ‘देवापासून देशाकडे’ आणि रामापासून राष्ट्राकडे’ असा नवा मंत्री मोदींनी दिला आहे.