भारतरत्न लालकृष्ण आडवाणी ( Lal Krishna Advani ) यांचा जन्मदिवस. भाजपाच्या नेत्यांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. आज लालकृष्ण आडवाणी ९७ वर्षांचे झाले आहेत. भाजपाचे २ खासदार ते भाजपाचे ३०३ खासदार हा सगळा प्रवास त्यांनी पाहिला आहे. लालकृष्ण आडवाणी म्हटलं की रथयात्राही आठवतेच. मंदिर वहीं बनाएंगे ही त्यांची घोषणाही आठवते. लालकृष्ण आडवाणी यांनी पाहिलेलं मंदिराचं स्वप्नही पूर्ण झालं आहे. मात्र हे स्वप्न इतकं सहज, सोपं नव्हतं. लालकृष्ण आडवाणींच्या ( Lal Krishna Advani ) संघर्षाची ती यशोगाथा आहे. लालकृष्ण आडवाणी यांनी राजकारणातल्या यात्रा कल्चर सुरु केलं. त्यामुळे त्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे.
राम मंदिराचा सोहळा घरात बसूनच पाहावा लागला
गेल्या काही वर्षांपासून लालकृष्ण आडवाणी ( Lal Krishna Advani ) सक्रिय राजकारणातून अलिप्त राहिले होते. जानेवारी महिन्यात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. राम मंदिराच्या उभारणीसाठी लालकृष्ण ( Lal Krishna Advani ) आडवाणी यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात प्रचंड मोठी चळवळ उभारली. बाबरी मशीदीच्या विवादित जागेवर राम मंदिर व्हावं म्हणून त्यांनीच पुढाकार घेतला होता. त्यामुळे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने आडवाणी पुन्हा एकदा चर्चेत आले होते. सुरुवातीला त्यांच्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना निमंत्रण नाकारण्यात आलं होतं. यावरून प्रचंड गदारोळ झाला. अखेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी कृष्ण गोपाल, राम लाल आणि विहिंपचे आलोक कुमार यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या घरी जाऊन प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित केलं होतं. परंतु, प्राणप्रतिष्ठा दिनी अयोध्येत तापमान घसरलं होतं. थंडी वाढली होती, त्यामुळे लालकृष्ण आडवाणी यांनी तिथे जाणं टाळलं.
लालकृष्ण आडवाणी यांनी राजकारणात सुरु केलं ‘यात्रा कल्चर’
लालकृष्ण आडवाणी हे असे नेते आहेत ज्यांनी राजकारणात यात्रांची संस्कृतीच एक प्रकारे रुजवली. अयोध्येत राम मंदिर झालंच पाहिजे ही मागणी जेव्हा सातत्याने होत होती तेव्हा लालकृष्ण आडवाणी यांनी गुजरातच्या सोमनाथपासून अयोध्येपर्यंत रथायात्रा काढली होती. ज्यानंतर देशाच्या राजकारणात हिंदुत्वाचं राजकारण उदयाला आलं. त्यावेळी बिहारचे मुख्यमंत्री असलेल्या लालूप्रसाद यादव यांनी समस्तीपूरमध्ये लालकृष्ण आडवाणी यांना अटक केली. या निर्णयामुळे लालकृष्ण आडवाणी ( Lal Krishna Advani ) आणि लालूप्रसाद यादव हे दोघंही त्या काळातले चर्चेतले चेहरे ठरले होते.
११ नोव्हेंबर १९९५ ला काय घडलं?
११ नोव्हेंबर १९९५ ला मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानात एक मोठ्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत लालकृष्ण आडवाणी बोलत होते. त्यांनी पुढच्या निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचा चेहरा अटलबिहारी वाजपेयी असतील ही घोषणा केली. हे नाव आडवाणींनी जाहीर करणं त्यावेळी सगळ्यांनाच आश्चर्य वाटणारं ठरलं. त्यावेळी आडवाणी यांचे निकटवर्तीय गोविंदाचार्य यांनी आडवाणींना विचारलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सल्लामसलत केल्याशिवाय तुम्ही वाजपेयींचं नाव कसं काय घोषित केलं? त्यावर आडवाणी चटकन म्हणाले की मी जर संघाला या गोष्टीची कल्पना दिली असती तर त्यांनी या नावाला होकार दिला नसता. विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनीही सांगितलं की आडवाणी अशी काही घोषणा करतील हे कुणालाही माहीत नव्हतं. याचं कारण लालकृष्ण आडवाणी हेच पुढच्या निवडणुकीत पंतप्रधानपदाचा चेहरा असतील असंच सगळ्यांना वाटत होतं. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आडवाणी यांना हा प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले, “आम्हाला आमची मतं वाढवण्याची गरज आहे, त्यासाठी आम्ही अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव जाहीर केलं.” लालकृष्ण आडवाणी ( Lal Krishna Advani ) खरंतर स्वतः पंतप्रधान होऊ शकले असते. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यानंतर त्यांना पंतप्रधान होता आलं नाही.
आडवाणी संघाचे सदस्य कसे झाले त्याचा किस्साही रंजक
लालकृष्ण आडवाणी ( Lal Krishna Advani ) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य कसे झाले? तो किस्साही त्यांनी स्वतःच सांगितला आहे. आडवाणी यांच्या आत्मचरित्रात हा उल्लेख आहे. “शाळा संपल्यानंतरची सुट्टी मी हैदराबादच्या सिंधमध्ये घालवत होतो. त्यावेळी मी टेनिस शिकत होतो. एकदा मॅच खेळत असताना माझ्या पार्टनरने मॅच ऐन भरात आलेली असताना खेळ थांबवला. मी त्याला विचारलं काय रे? तू सेट पूर्ण न करता मॅच सोडून का चालला? तर त्यावर त्याने मला सांगितलं मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य आहे. शाखेत जाण्यासाठी उशीर करु शकत नाही. कारण शाखेत जाण्याची वेळ ही काटेकोरपणे पाळायची असते. तिथे ती शिस्त कसोशीने पाळली जाते.” आडवाणींना ही बाब आवडली आणि त्यानंतर ते स्वतः संघाचे सदस्य झाले. एका टेनिस मॅचने त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जाण्याची वाट कशी दाखवली हे त्यांनी या प्रसंगातून सांगितलं आहे.