Dharmasthala Mass Burial Case: एका सफाई कामगाराने पोलिसांना पत्राद्वारे कर्नाटकातील धर्मस्थळ येथे नेत्रावती नदीच्या काठावर शेकडो मृतदेह पुरल्याचा दावा केला होता. त्यानंतर एसआयटीने १३ ठिकाणी खोदकाम सुरू केले. खोदकामाच्या तिसऱ्या दिवशी घटनास्थळ क्रमांक ६ वर मानवी हाडे सापडली आहेत. प्राथमिक तपासात ही हाडे पुरुषाची असल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी घटनेच्या १३ पैकी एका ठिकाणापासून अडीच फूट खोलीवर लाल ब्लाउजचा तुकडा, एटीएम आणि पॅन कार्ड सापडले होते.
नेत्रावती नदीच्या काठावरील वनक्षेत्रात उत्खननादरम्यान किमान १५ हाडे सापडली आहेत. त्यापैकी अनेक हाडे तुटलेल्या अवस्थेत आहेत. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, उत्खननात कोणतीही कवटी सापडली नाही. फॉरेन्सिक पथकाने हाडे ताब्यात घेतली आहेत.
उत्खनन जसजसे पुढे जात आहे तसतसे प्रकरण अधिक गंभीर होत चालले आहे. सफाई कामगार म्हणतो की, यापैकी एक अशी जागा आहे जिथे त्याने सर्वाधिक मृतदेह पुरले आहे. त्याने हे सर्व १९९५ ते २०१४ दरम्यान केले. त्याने असाही दावा केला आहे की, त्याने पुरलेले बहुतेक मृतदेह महिला किंवा मुलींचे होते.
साक्षीदाराने नेत्रावती नदीच्या काठावर आठ ठिकाणी मृतदेह पुरल्याचे सांगितले आहे. उर्वरित ५ ठिकाणे जंगलात आहेत. एसआयटी सूत्रांनी सांगितले आहे की, सफाई कर्मचाऱ्याने पुरावा म्हणून पोलिसांना एक कवटी दिली होती. पण, त्याने कवटी कुठे सापडली हे सांगितले नाही. त्याने सांगितले की, तो धर्मस्थळला गेला आणि शांतपणे कवटी खोदून काढून आणली.
मिळालेल्या माहितीनुसार, दुसऱ्या घटनास्थळी उत्खनन करताना ब्लाउजचा एक तुकडा सापडला आहे. याशिवाय पॅन कार्ड आणि एटीएम कार्ड सापडले आहे. कार्ड लक्ष्मी नावाच्या महिलेचे होते. माहितीनुसार, त्या महिलेचा २००९ मध्ये मृत्यू झाला. पण, पोलीस रेकॉर्डमध्ये तिचा उल्लेख नाही.
काय आहे प्रकरण?
न्यायालयात हजर झालेला गुप्त साक्षीदार हा धर्मस्थळ मंदिरात १९ वर्षे काम केलेला सफाई कर्मचारी आहे. त्याने असा दावा केला आहे की, त्याने स्वतःच्या हातांनी धर्मस्थळमध्ये शेकडो मृतदेह पुरले आहेत. त्याने असाही दावा केला आहे की मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुतेक महिला व मुली बलात्कार आणि हत्या झालेल्या होत्या. त्याने असा दावा केला की, त्याने मंदिर प्रशासनाच्या आदेशावरूनच मृतदेह पुरले होते.
या गुप्त साक्षीदाराने असा दावा केला आहे की, त्याच्या कुटुंबातील एका मुलीचीही हत्या करण्यात आली. त्यानंतर त्या रात्री तो पळून गेला. तेव्हापासून तो भीतीने आणि लपूनछपून जगत आहे.