Dharmasthala secret burials case : प्रसिद्ध कन्नड युट्यूबर समीर एमडीवर याच्यावरोधात व्हिडीओच्या माध्यमातून खोटी महिती फसवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका माजी सफाई कर्मचार्याने काही दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचाराच्या पीडितांचे मृतदेह गुप्तपणे कर्नाटकच्या धर्मस्थळ येथे दफन करण्यात आल्याचा दावा केला होता. या संबंधित व्हिडीओ बनवून खोटी माहिती पसरवल्याचा आरोप या युट्यूबरवर ठेवण्यात आला आहे.
‘धर्मस्थळाचे सिरीयल केलर कोण आहेत? (Who Are Serial K!llrs of Dharmasthala?)’ असे शीर्षक असलेला हा व्हिडीओ २३ मिनिट आणि ५२ सेकंदांचा होता आणि याला शनिवारी अपलोड केल्यापासून युट्यूबवर याला ३.१ दशलक्ष व्ह्यूज मिळाले होते.
दक्षिण कन्नडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ आर्टिफीशीयल इंटेलिजन्स वापरून तयार करण्यात आलेला होता आणि यामध्ये या दफन प्रकरणाबद्दल बनावट गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. माजी सफाई कर्मचार्याने अधिकृत तक्रारीत दिलेली माहिती आणि शुक्रवारी कोर्टात पार पडलेल्या सुनावणीदरम्यान त्याच्या नोंदवलेल्या जबाबात समोर आलेल्या माहितीपेक्षा खूप पुढे जात या व्हिडीओत बनावट माहिती देण्यात आली होती.
पोलिसांनी सांगितले की, व्हिडिओमधून फक्त चुकीची माहितीच पसरवली गेली नाही तर माजी सफाई कर्मचाऱ्याच्या तक्रारदाराबद्दल अतिरिक्त माहिती देखील उघड केली आहे.
समीर एमडी विरुद्ध धर्मस्थळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १९२, २४०, ३५३(१)(ब) अंतर्गत दंगल घडवण्याच्या उद्देशाने चिथावणी देणे आणि गुन्ह्याबद्दल खोटी माहिती देणे यासह इतर आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंगळुरू कोर्टाने ए्प्रिल महिन्यात, १४ वर्षांपूर्वी झालेल्या आणि न उलगडलेल्या एका कॉलेज विद्यार्थ्याच्या हत्येबद्दल व्हिडीओ बनवल्यानंतर समीर एमडीला १० कोटींच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याची नोटीस पाठवली होती.
धर्मस्थळ दफन प्रकरण काय आहे?
धर्मस्थळ शहराच्या जवळ असलेल्या जंगलात गुप्तपणे काही मृतदेह दफन करण्यास आपल्याल भाग पाडण्यात आले होते, असा दावा एका माजी सफाई कर्मचाऱ्याने केला आहे.
त्याने आरोप केला आहे की, त्याला अनेक मृतदेह दफन करण्यास भाग पाडण्यात आले आणि या मृतदेहांवर लैगिंक अत्याचार झाल्याच्या खुणा दिसत होत्या. तसेच त्याच्या सुपरवायजरने ही बाब उघड न करण्याबाबत त्याला इशारा दिला होता असा दावाही या व्यक्तीने केला होता. दहा वर्षापूर्वी तो धर्मस्थळ येथून पळून गेला होता, पण अपराधीपणाच्या भावनेतून तो परत आला आणि त्याने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात नेमकं काय सत्य बाहेर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.