रामदेव बाबा आता भगवे कपडे घालून जीन्स आणि बूट विकणार, अशी खोचक टीका काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी केली आहे. रामदेव बाबा यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या पतंजली समूहाच्या माध्यमातून वस्त्रोद्योगात प्रवेश करण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर दिग्विजय सिंह यांनी ट्विटरद्वारे रामदेव बाबांचा समाचार घेतला. रामदेवबाबा भगवी वस्त्रे घालून जीन्स आणि बूट विकणार आहेत. आखाडा परिषद आणि साधूसंत रामदेवबाबांकडून होत असलेला भगव्या वस्त्राचा हा अपमान किती दिवस सहन करणार आहेत. देशात सध्या कष्टाने आणि प्रामाणिकपणे पैसे कमाविणाऱ्या व्यावसायिकांवर छापे पडत आहेत. दुसरीकडे रामदेवबाबा आणि बाळकृष्ण हे खोऱ्याने पैसे ओढत आहेत, असे दिग्विजय सिंह यांनी ट्विटमधील संदेशात म्हटले आहे.
रामदेव बाबांच्या जीन्सचा लूक झाला व्हायरल
काही दिवसांपूर्वी रामदेव बाबांच्या जीन्स पँटच्या निर्मितीचा विषय सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. पतंजलीकडून कपड्यांच्या निर्मितीसाठी १० प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्री-पुरुषांच्या कपड्याची निर्मिती केली जाणार आहे. वस्रोद्योगाच्या उत्पादनाची सुरुवात जीन्सच्या निर्मितीने केली जाणार आहे. आगामी दोन वर्षात पतंजली ट्रस्ट नव्या उद्योगाच्या माध्यमातून ५० कोटींची उलाढाल करण्याचा मानस आहे. यामध्ये स्वदेशी शूज बाजारात आणण्याचा विचार असल्याचेही पतंजलीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पतंजली ट्रस्टचा हा मानस पूर्ण झाल्यास त्यांची दिग्गज कंपन्याच्या यादीत वर्णी लागू शकते. एका इंग्रजी वर्तमानाने दिलेल्या माहितीनुसार, देशी जीन्सच्या निर्मितीसाठी बाबा रामदेव यांची पतंजली ट्रस्ट बांगलादेशमध्ये जीन्सचे उत्पादन करण्याची शक्यता आहे. बांगलादेशमध्ये उत्पादनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली वेगळी ओळख निर्माण होण्यास पतंजलीला मदत होईल, मात्र स्वदेशी कपड्यांची विदेशातून निर्मिती झाल्यास पतंजलीच्या देशी वस्रोद्योगाच्या निर्मितीवर प्रश्नचिन्ह देखील निर्माण होऊ शकते.