गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सत्तेच्या भुकेला सीमा नाहीत, या शब्दांत कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी शुक्रवारी मोदींवर पलटवार केला. मोदी यांनी गुरुवारी स्वातंत्र्यदिनानिमित्त गुजरातमध्ये केलेल्या भाषणात पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर दिग्विजयसिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदींवर पलटवार केला.
स्वातंत्र्यदिनानिमित्त मोदी यांनी केलेल्या भाषणाबद्दल माझे आणि अडवाणींचे एकमत आहे. मोदी यांच्या सत्तेच्या भुकेला सीमा नाहीत, अशा आशयाचे ट्विट दिग्विजयसिंह यांनी केले आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त केल्या जाणाऱया भाषणामध्ये नेत्यांनी एकमेकांची उणीदुणी काढू नयेत, असे म्हणत लालकृष्ण अडवाणी यांनी मोदींना गुरुवारी घरचा आहेर दिला होता. त्यानंतर दिग्विजयसिंह यांनी मोदीवर पलटवार केला. मनमोहनसिंग पाकिस्तानविरुद्ध कडक भूमिका घेत नाहीत तसेच अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणण्यात ते अपयशी ठरले आहेत, अशी टीका मोदी यांनी भूजमधील भाषणात केली होती.