काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्यावर पत्रकारपरिषदेत केलेल्या एका विधानामुळे सारवासारव करण्याची वेळ आली. यावेळी दिग्विजय सिंह यांनी जम्मू-काश्मीरचा उल्लेख ‘भारतव्याप्त काश्मीर’ असला केला. मात्र, एका पत्रकाराने ही बाब ध्यानात आणून देताच माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता, असे सांगत सारवासारव केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पाकिस्तानच्या बलुचिस्तान व गिलगिट प्रांतातील आझादीच्या आंदोलनाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शविला होता. या पार्श्वभूमीवर बोलताना दिग्विजय सिंह यांनी म्हटले की, नरेंद्र मोदी पाकव्याप्त काश्मीरबद्दल जास्त चर्चा करतात. त्यांनी बलुचिस्तानमधील जनतेचे आभार मानले. मात्र, ते काश्मीरमधील जनतेशी बोलायला तयार नाहीत. आपल्याला सर्वप्रथम काश्मीरी जनतेमध्ये विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे, मग ती पाकव्याप्त काश्मीरमधील जनता असो किंवा भारतव्याप्त काश्मीरमधील जनता असो. आपल्याला या लोकांमध्ये केवळ संवादाच्या माध्यमातूनच विश्वासाची भावना निर्माण करता येऊ शकते. वाद-प्रतिवाद करून परिस्थिती सुधारणार नाही, ती आणखीनच बिघडेल, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले. त्यानंतर दिग्विजय सिंह पत्रकारपरिषद आटपून निघण्याच्या बेतात होते. त्याचवेळी एका पत्रकाराने तुम्ही भारतव्याप्त काश्मीर असा उल्लेख का केलात, असे विचारले. तेव्हा दिग्विजय सिंह यांना स्वत:ची चूक लक्षात आली. त्यानंतर दिग्विजय सिंग यांनी लगेच सारवासारव करत मला भारतातील काश्मीर म्हणायचे होते, असे स्पष्टीकरण दिले. मोदी भारतातील काश्मीरचा विचार करत नाहीत, फक्त पाकव्याप्त काश्मीरबद्दल बोलतात, असा माझ्या बोलण्याचा अर्थ होता. काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, असे सिंह यांनी म्हटले.
मोदींचे पाकवर ‘बलुचि’अस्त्र
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला एकीकडे भारतीय सेनादलांना मिठाई देणाऱ्या आणि दुसरीकडे जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात ‘बलुचि’अस्त्र उगारले होते. पाकिस्तान जर जम्मू-काश्मीर आणि भारतात अन्यत्र दहशतवादाला खतपाणी घालून अस्थैर्य निर्माण करणे बंद करणार नसेल, तर भारतालाही पाकमधील बलुचिस्तान प्रांतातील दडपल्या गेलेल्या जनतेच्या स्वातंत्र्यकांक्षांना फुंकर घालण्याचा पर्याय अवलंबावा लागेल, असा गर्भित इशाराच या भाषणातून मोदी यांनी दिला होता.
सत्तरीचे साहस