माजी परराष्ट्र सचिव आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल रोमेश भंडारी यांचे शनिवारी रात्री येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी व कन्या असा परिवार आहे. भंडारी यांना यकृताच्या कर्करोगाने ग्रासल्यामुळे तीन आठवडय़ांपूर्वी गुरगाव येथील मेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
भंडारी यांनी १९८५-८६ या काळात परराष्ट्र सचिवपदाची जबाबदारी संभाळली होती. याखेरीज, त्रिपुरा व गोवा या राज्यांच्या राज्यपालपदीही ते काही काळ होते. दिल्लीचे नायब राज्यपालपदही त्यांनी संभाळले होते. उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू झालेली असताना १९९५-९६ मध्ये त्या राज्याच्या राज्यपालपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती.