कोविशिल्ड लशीच्या दोन मात्रांत ४ आठवडे की ८ आठवडे अंतर ठेवायचे यावर चर्चा चालू आहे, असे कोविड १९ कार्यकारी गटाचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी सांगितले.

जे पुरावे व बातम्या येत आहेत त्यानुसार अंशत: व पूर्ण लसीकरणाचा मुद्दा चर्चिला जात आहे. दोन मात्रांतील अंतर चार ते सहा आठवडे असावे की, १२ ते १६ आठवडे असावे यावर काय निर्णय घेणार असे विचारले असता त्यांनी सांगितले की, जो काही निर्णय घेतला जाईल तो वैज्ञानिक माहितीच्या आधारे घेतला जाईल. ‘नॅशनल टेक्निकल अ‍ॅडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन’ या गटात त्याबाबत कुठलेही मतभेद नाहीत. कोविड १९ व लसीकरण या दोन्ही प्रक्रिया वेगवेगळ्या आहेत. जर दोन मात्रांमधील अंतर कमी करण्याने पाच ते १० टक्के लोकांना फायदा होणार असेल, तरी आम्ही त्या आधारे निर्णय घेऊ. दुसरीकडे जर आताचा दोन मात्रातील अंतर जास्त ठेवण्याचा निर्णय योग्य आहे त्यामुळे फायदा होत आहे असे वाटले, तर आताचा निर्णय कायम ठेवला जाईल. अ‍ॅडनोव्हेक्टर लशींचा परिणाम नेमका कशा पद्धतीने होत आहे, याची शास्त्रीय कारणमीमांसा करूनच दोन मात्रांतील अंतर वाढवले गेले होते.

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पब्लिक हेल्थ इंग्लंड या संस्थेने म्हटले होते की, दोन मात्रांतील अंतर १२ आठवडे ठेवले तर परिणामकारकता वाढते. कारण त्या वेळी अल्फा विषाणूची साथ होती. त्यातून ब्रिटनला बाहेर पडता आले कारण दोन मात्रांतील अंतर १२ आठवडे होते. त्यांचे बघून आम्हीही ही कल्पना उचलली. कारण त्यामागे काही वैज्ञानिक कारणमीमांसा होती. १३ मे रोजी आम्ही दोन चाचण्यांतील अंतर १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय घेतला.  काही अभ्यासात दिसून आले की, चार ते आठ आठवड्यांचे अंतर ठेवल्यास ५७ टक्के परिणामकारकता मिळते. आठ आठवड्यांच्या अंतरात ती साठ टक्के असते. ब्रिटनमधील पुढच्या संशोधनानंतर आम्ही हे अंतर बारा आठवडे केले असे अरोरा यांनी स्पष्ट केले.

एका मात्रेने जास्त संरक्षण मिळते की, दोन मात्रांनी यावर अरोरा यांनी सांगितले की, वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे ते स्पष्ट केले जाईल. लस मात्रातील अंतर वाढवल्यानंतर एका मात्रेने केवळ ३३ टक्के संरक्षण मिळते व दोन मात्रांनी ६० टक्के संरक्षण मिळते अशा बातम्या आल्या, त्यामुळे आता पुन्हा चार ते आठ आठवड्यांचे अंतर ठेवावे की नाही यावर चर्चा सुरू करण्यात आली आहे.

काँग्रेसची खुलाशाची मागणी

मुंबई : करोना साथरोगाचे संकट हाताळण्यात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सपशेल अपयशी ठरल्याचे वारंवार उघड झाले आहे. मात्र लोकांच्या जीवितापेक्षा नरेंद्र मोदी यांचा आपली प्रतिमा जपण्याचा खटाटोप सुरू आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी के ली आहे. कोव्हिशिल्डच्या दोन मात्रांमधील अंतर ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय कशाच्या आधारावर घेण्यात आला, याचा खुलासा झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी के ली.

यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, ज्या शास्त्रज्ञांचा हवाला देत मोदी सरकारने कोव्हिशिल्ड लशींच्या दोन मात्रांमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते तो सरकारचा दावा धादांत खोटा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दोन लशीमधील अंतर वाढवण्याचा निर्णय फक्त कोव्हिशिल्ड लशीबद्दलच का घेतला गेला, लशींच्या तुडवड्यामुळे लसीकरण केंद्रे बंद करण्याची वेळ आली आणि त्यामुळे मोदींची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून हा सारा खटाटोप केला आहे का, असा सवाल त्यांनी के ला.