मयुरा जानवलकर,एक्स्प्रेस वृत्त

पणजी, मुंबई : भाजप नेत्या शायना एनसी यांच्या कुटुंबीयांच्या गोव्यातील ऐतिहासिक व पुरातन क्षेत्रातील बंगल्याच्या बांधकामावरून वाद सुरू झाला आहे. काही कार्यकर्ते व रहिवाशांनी बुधवारपासून उपोषण व आंदोलन सुरू केले आहे. या बंगल्याच्या बांधकाम परवानग्या देताना चूक झाली असून त्या रद्द करण्यात येत असल्याचे गोव्याचे उपमुख्यमंत्री व नगर नियोजनमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी जाहीर केले. दरम्यान, सरकार जुन्या गोव्यातील बेकायदा बांधकामाविरोधात कारवाई करणार आहे. सर्वाचे आंदोलन सुरु आहे. मात्र ही परवानगी देण्यास माझे सरकार जबाबदार नाही, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

या परवानग्या माझ्या कार्यकाळात देण्यात आलेल्या नसून याबाबत चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या बंगल्याची जागा शायना एनसी यांचे पती मनीष मुनोत यांनी २०१५ मध्ये विकत घेतली होती आणि त्याच्या पुनर्बाधणीचे काम सुरू आहे. या एकमजली बंगल्याच्या एका बाजूला मांडवी नदी असून दुसऱ्या बाजूला सेंट कँस्टन चर्च आहे. जुन्या गोव्यातील सेंट कँस्टन चर्चजवळ शेकडो नागरिकांनी गेल्या रविवारी जमून या बंगल्याच्या बांधकामाविरोधात निदर्शने केली.

या बंगल्याच्या बांधकामाबाबत कायदेशीर सल्ला घेऊन ते थांबविण्याची नोटीस दिली जाईल व परवानग्या रद्द केल्या जातील, असे पंचायतीकडून सांगण्यात आले असून बांधकाम पाडले जाईपर्यंत उपोषण आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.

हे बांधकाम कायदेशीर की बेकायदा आहे, हे सांगता येणार नाही. त्यांनी आवश्यक मंजुऱ्या आणल्याने आम्हीही बांधकाम परवाने दिले, असे सरपंच जनिता मडकईकर यांनी सांगितले.   केंद्रीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने बंगल्याच्या दुरुस्तीला परवानगी दिली होती, पुनर्बाधणीला नाही, असेही नुकतेच निदर्शनास आले असल्याचे सांगण्यात येते.

 बांधकाम परवाने रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल, या उपमुख्यमंत्री कवळेकर यांच्या वक्तव्याचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले असले तरी बांधकाम पाडले जाईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा अ‍ॅना ग्रँशियस यांनी दिला आहे. या बंगल्याच्या बांधकामामुळे पुरातन वारसा वास्तूला धक्का लागून नुकसान झाले आहे. असे ग्रँशियस यांनी नमूद केले.

शायना एनसी या गोव्यातील नाहीत. येथील लोक असे करण्यास संमती देणार नाहीत, असे मारिया ख्रिस्तीना वरेला यांनी नमूद केले.

आपचे गोवा निमंत्रक राहुल म्हांब्रे, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनीही ते पाडण्याची भूमिका घेतली आहे. त्यांनी आंदोलकांना पाठिंबा जाहीर केला आहे. विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री मायकेल लोबो यांनीही हे बांधकाम पाडण्याचे आदेश मुख्य मंत्र्यांनी  द्यावेत, अन्यथा हजारो नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा दिला आहे. हे बांधकाम ना विकास क्षेत्रात असून प्रभावशाली व्यक्ती गोव्यात येऊन आपले वजन वापरत असतील, तर ते हटविले पाहिजे. त्यांना जे काही करायचे असेल ते करू देत, असे लोबो यांनी स्पष्ट केले. हे बांधकाम जर बेकायदा असेल, तर पाडावे, अशी भूमिका गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानवडे यांनी घेतली आहे.

बांधकामाशी संबंध नाही-शायना

आमचा या बांधकामाशी कोणताही संबंध नाही व त्यांनी हे काम रद्द केल्याचे शायना एनसी व मुनोत यांनी सांगितले. आम्ही या बांधकामाचे मालक नाही व या प्रकरणी काहीही बोलण्यात रस नाही, असे शायना एनसी यांनी सांगितले.