बेताल विधानांमुळे चर्चेत राहणाऱ्या पुद्दूचेरीच्या नायब राज्यपाल आणि माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या एका निर्णयामूळे वाद निर्माण झाला आहे. हागणदारीमुक्त आणि स्वच्छता नसलेल्या गावांना सरकारकडून मोफत तांदूळ मिळणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

किरण बेदी यांनी शनिवारी उघड्यावर शौचावर जाण्याचे प्रकार बंद व्हावे तसेच गाव कचरामुक्त व्हावा, यासाठी कठोर उपाययोजना राबवण्याचे संकेत दिले. गावात शौचालय बांधण्याच्या तसेच गाव स्वच्छ ठेवण्याच्या मोहीमेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. स्थानिक प्रशासन, अधिकारी यासाठी गंभीर नाही. गेल्या दोन वर्षांत फार बदल झालेला नाही. पण आता हा सगळा प्रकार आता थांबवण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. पुद्दूचेरीत सरकारतर्फे मोफत तांदूळ दिले जाते. यापुढे ज्या गावात उघड्यावर शौचावर जाण्याचे प्रकार बंद होणार नाही आणि गावात अस्वच्छता असेल त्या गावाला मोफत तांदूळ मिळणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक गावाला त्यांनी चार आठवड्यांची मुदत दिली आहे. चार आठवड्यात गाव हागणदारीमुक्त झाल्याचे तसेच स्वच्छ असल्याचे प्रमाणपत्र ग्रामस्थांना सादर करावे लागणार आहे. स्थानिक प्रशासन आणि आमदार यांची स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र गावाला दिले जाणार आहे. ३१ मेपर्यंत सर्व गावांनी हे प्रमाणपत्र सादर करावे, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे प्रमाणपत्र सादर केल्यावर त्याची पडताळणी देखील केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. किरण बेदी यांच्या या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. काहींनी निर्णयाचे स्वागत केले असून काहींनी निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.