टाटा स्टील कंपनीच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आल्यामुळे चर्चेत आलेल्या सायरस मिस्रींनी शनिवारी देवाच्या दर्शनासाठी शनी शिंगणापूरला पोहचले. सायरस मिस्त्री यांनी शनी शिंगणापूर जाऊन शनीचे दर्शन घेतले. टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरुन पायाउतारा व्हावे लागल्यामुळे त्यांनी शनीदेवाचे दर्शन घेतल्याची चर्चा सध्या उद्योगजगतात सुरु झाली आहे. शनी शिंगणापूरला जाऊन सायरस मिस्रींनी शनीला अभिषेक करुन पूजा केली. सध्या त्यांच्या मागे लागलेल्या साडेसातीपासून सुटका मिळविण्यासाठी त्यांनी शनीदेवाला साकडे घातल्याची चर्चा देखील रंगली आहे. यादरम्यान मिस्री यांनी शिर्डीला जाऊन साईबाबाचे दर्शन देखील घेतले.
सायरस मिस्त्री यांना टाटा स्टीलच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले होते. बॉर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या बैठकीत मिस्त्रींना हटवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या जागी ओ पी भट यांची हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ऑक्टोबरदरम्यान सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले होते. मीठ, डाळी असे खाद्यपदार्थ ते वाहन, माहिती तंत्रज्ञान असे वैविध्य असलेल्या ११० अब्ज डॉलर्सच्या व्यवसाय समूहातील विशेषत: टाटा स्टील, टाटा मोटर्स, टीसीएस कंपन्यांना जागतिक स्तरावर अधिक फटका बसत होता. चालू आर्थिक वर्षांतील दुसऱ्या तिमाहीच्या वित्तीय निष्कर्षांचा हंगाम सुरू असतानाच टीसीएससारख्या कंपन्यांची आर्थिक कामगिरी फारशी समाधानकारक नव्हती. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या मिस्त्री यांच्या कारकिर्दीत समूहाला आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक फटका सहन करावा लागला होता. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मिस्त्रींना नारळ देण्यात आला होता.
टाटा सन्सपाठोपाठ आता टाटा समुहाच्या अखत्यारित येणा-या अन्य कंपन्यांच्या अध्यक्षपदावरुनही मिस्त्रींना हटवण्याचा धडाका सुरु आहे. शुक्रवारी टाटा स्टीलच्या अध्यक्षपदावरुन मिस्त्रींना हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. मिस्त्री आणि नसली वाडिया यांची कंपनीच्या संचालक मंडळातूनही हकालपट्टी करण्यासाठी कंपनीने विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. २१ डिसेंबरला ही सभा होणार आहे. मिस्त्री यांच्यानंतर आता ओ पी भट यांच्याकडे हंगामी अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे. विशेष सर्वसाधारण बैठकीतील निर्णय येईपर्यंत भट अध्यक्षपदी असतील असे कंपनीने म्हटले आहे. सुशासन आणि कंपनीला चांगले नेतृत्व देण्यासाठीच भट यांची नियुक्ती केल्याचे कंपनीने म्हटले आहे. टाटा सन्सचा टाटा स्टीलमध्ये २९.७५ टक्के हिस्सा आहे.