दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) ने ढाका मेट्रोच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यापुर्वी २००२ मध्ये दिल्लीत मेट्रो सेवा सुरू होण्यापूर्वी  डीएमआरसीने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पहिली तुकडी प्रशिक्षणासाठी हाँगकाँगला पाठवली होती. दरम्यान आता ढाका मेट्रोच्या कर्मचाऱ्यांना आता शास्त्री पार्क डेपोमध्ये असलेल्या दिल्ली मेट्रो रेल अकादमीमध्ये प्रशिक्षण दिले जात आहे.

करोना साथीच्या काळात प्रतिकूल परिस्थितीतही पुढे जात असताना मेट्रोने आपली व्याप्ती वाढवली आहे. या उपक्रमामुळे डीएमआरसीला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षणाच्या दृष्टीने एक नवीन ओळखही मिळणार आहे.

डीएमआरसीने दिलेल्या माहितीनुसार ढाका मेट्रो देखभाल आणि ऑपरेशन कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. पहिल्यांदाच, ढाका मेट्रोच्या मुख्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पहिल्या तुकडीला  डीएमआरसीकडून प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये १९ ऑपरेशन्स आणि १७ रोलिंग स्टॉक ऑफिसर्सचा समावेश आहे. अभ्यासक्रमांचा प्रशिक्षण कालावधी २४ दिवस ते १५६ दिवसांच्या दरम्यान वेगवेगळ्या स्वरुपात ठेवला आहे. प्रशिक्षणादरम्यान, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नोकरी दरम्यान आवश्यक असलेल्या सर्व बाबींचे प्रशिक्षण दिले जात आहे. 

ढाका मेट्रो २०.१ किलोमीटर अंतराचा समावेश असलेली ‘एमआरटी लाइन – ६’ म्हणून ओळखली जाणारी पहिली लाईन सुरू करून मेट्रोचा प्रवास सुरू करणार आहे. दिल्ली मेट्रोच्या मते, या प्रशिक्षणामुळे केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर एमआरटीएस क्षेत्रात डीएमआरएची प्रमुख प्रशिक्षण संस्था म्हणून प्रतिमा उंचावेल. याआधी, डीएमआरएकडून एमआरटी जकार्ता आणि एलआरटी कोलंबोसाठी देखील अल्पकालीन अभ्यासक्रम घेतले जात होते.