उत्तर प्रदेशमध्ये सध्या आगामी विधानसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरु झाली आहे. अर्थात अद्याप निवडणुकांच्या तारखांची किंवा इतर कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी पुढील वर्षाच्या पहिल्या काही महिन्यांमध्येच येथे विधानसभा निवडणुका होतील असं म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता मोठमोठ्या मंत्र्यांचे या ना त्या कारणाने देशातील सर्वात मोठ्या राज्याचे दौरे सुरु झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही मागील काही काळामध्ये अनेकदा उत्तर प्रदेशला गेलेत. नुकतीच त्यांनी पुर्वांचल एक्सप्रेसवेच्या लोकार्पण सोहळ्याला हजेरी लावलेली. आता पुन्हा एकदा मोदी २२ नोव्हेंबर म्हणजेच सोमवारी राजधानी लखनऊमध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. या कार्यक्रमाची पूर्व तयारी पोलिसांनी याच आठवड्यावपासून सुरु केलीय. मात्र याच तयारीसंदर्भात पोलिसांनी जारी केलेलं एक पत्र सध्या फारच चर्चेत आहे. मोदींचा सुरक्षेचा भाग म्हणून पोलिसांनी या भागातील लोकांना १९ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबरदरम्यान खिडकीमध्ये, बाल्कनीत कपडे वाळत घालू नका असे निर्देश दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

लखनऊमध्ये मोदींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेल्या ठिकाणी असलेल्या सरस्वती अपार्टमेंटला गोमतीनगर पोलीस स्थानकाचे प्रभारी निरीक्षक प्रशांत कुमार मिश्रा यांनी एक पत्र पाठवलं आहे. यामध्ये मोदींचा दौरा होईपर्यंत सुरक्षेसंदर्भातील उपाययोजनांचा उल्लेख केलाय. तसेच स्थानिकांनी काय काळजी घ्यावी याबद्दलच्या सूचना देण्यात आल्यात. पण या सूचनांमध्ये एक सूचना कपडे वाळत घालण्याबद्दल आहे. कपडे बाहेर वाळत घालू नका, असं या पत्रात म्हटलंय.

पंतप्रधान गोमतीनगर पोलीस मुख्यालयाअंतर्गत येणाऱ्या भागामधील कार्यक्रमस्थळी २२ नोव्हेंबर २०२१ रोजी उपस्थित राहणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने या भागामधील सर्व उंच इमारतील आणि टॉवर्सला सूचना केल्या जात आहेत. यामध्ये सरस्वती अपार्टमेंट थेट पोलीस मुख्यालयाच्या समोर असल्याने तुम्हालाही यासंदर्भात सूचना करण्यात येत आहे, असं पोलिसांनी इमारतीच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

गोमतीनगर सेक्टर चारमधील सरस्वती अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सर्व रहिवाश्यांना सूचति करण्यात येत आहे की, १९ नोव्हेंबर २०२१ ते २२ नोव्हेंबर २०२१ दरम्यान बाल्कनी किंवा बाल्कनीच्या आजूबाजूला (खिडक्यांमध्ये) कुठेही कोणत्याही प्रकारची कपडे किंवा इतर गोष्टी लटकवू नका. तसेच या कालावधीमध्ये एखादी नवीन व्यक्ती तुमच्या इमारतीमध्ये वास्तव्यास आल्यास त्यासंदर्भातील माहिती तातडीने पोलीस स्थानकामध्ये कळवावी, असं पोलिसांनी या पत्रात म्हटलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या सोशल नेटवर्किंगवर हे पत्र चर्चेचा विषय ठरत आहे. ७०० हून अधिक जणांनी ते शेअर केलं असून साडेतीन हजारांहून अधिक जणांनी ते लाइक केलं आहे.