उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून आपल्याला धर्माच्या प्रमाणपत्राची गरज नाही, अशी टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी बुधवारी केली. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने महिलांसाठी वेगळा जाहीरनामा आणला आहे. पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी बुधवारी जाहीरनामा प्रसिद्ध करताना योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.

“योगीजींना माहित आहे का मी कोणत्या मंदिरात जाते आणि कधीपासून जात आहे? त्यांना माहित आहे का की मी वयाच्या १४ व्या वर्षापासून उपवास करतेय? त्यांना काय माहिती आहे? ते मला माझ्या धर्माचे किंवा माझा कोणत्या धर्मावर विश्वास आहे, याचे प्रमाणपत्र देतील का? मला त्यांच्या कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नाही,” असं प्रियंका गांधी म्हणाल्या.

यावेळी प्रियांका म्हणाल्या की, “आम्हाला खरोखरच महिलांना सक्षम बनवायचे आहे, आम्ही राज्याच्या निवडणुकीत पक्षाची ४० टक्के तिकिटे महिलांसाठी राखून ठेवण्यास सुरुवात केली आहे. आम्हाला हे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत वाढवायचे आहे, जेणकरून ते समान होईल.” दरम्यान, काँग्रेसने यूपीच्या महिलांसाठी जाहीरनाम्यात यूपीच्या २५ शहरांमध्ये नोकरदार महिलांसाठी वसतिगृहे उभारण्याची घोषणा केली आहे.

प्रियांका गांधींनी महिलांसाठी जारी केलेल्या जाहीरनाम्यात, मुलींना शैक्षणिक आधारावर स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक स्कूटी देऊन त्यांचे शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचवले जाईल, असे म्हटले आहे. काँग्रेस मुलींना दिलेले वचन पूर्ण करेल आणि त्यांना शिक्षण उपलब्ध करून देईल. क्रीडा क्षेत्रातील महिलांना सक्षम करण्यासाठी प्रियांकाने महिला क्रीडा अकादमीचीही घोषणा केली आहे. महिलांना समान अधिकार आणि सन्मान मिळाल्यावरच महिला सक्षमीकरण शक्य आहे, असे प्रियंका म्हणाल्या.