ऑपरेशनदरम्यान डॉक्टर महिला रुग्णाच्या पोटात टॉवेल विसरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसूतीकळा सुरु झाल्याने महिला रुग्णालयात दाखल झाली होती. उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी मुख्य वैद्यकीय अधिकारी राजीव सिंघल यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टराचं अमरोह परिसरात नर्सिंग होम असून यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. महिलेचं ऑपरेशन केल्यानंतर ते पोटात टॉवेल विसरले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे महिलेच्या पोटात टॉवेल राहिला होता. महिलेने पोटात दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर डॉक्टरने तिला पाच दिवस दाखल करुन ठेवलं होतं. थंडीमुळे पोटात दुखत असल्याचं तो महिलेला सांगत होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घरी आल्यानंतरही पोटात दुखत असल्याची तक्रार करत असल्याने महिलेचा पती शमशेर अली यांनी तिला दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात नेलं होतं. यानंतर त्यांना धक्काच बसला. ऑपरेशन करुन महिलेच्या पोटातील टॉवेल काढण्यात आला. अली यांनी वैद्यकीय अधिकाऱ्याकडे तक्रार केली असून कडक कारवाईची मागणी केली आहे.

“मला मीडियामधून या घटनेची माहिती मिळाली. नोडल अधिकाऱ्याला याप्रकरणी कारवाई करण्यास सांगण्यात आलं आहे, चौकशी पूर्ण झाल्यानंतरच आम्ही सविस्तर माहिती देऊ शकतो,” असं वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

शमशेर अली यांनी याप्रकरणी कोणतीही लेखी तक्रार केलेली नाही. मात्र याप्रकरणी चौकशी करण्याचं आश्वासन वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलं आहे.