वृत्तसंस्था, गाझा, जेरुसलेम

गाझा शहरातील अल-अहली रुग्णालयावर मंगळवारी रात्री झालेल्या बॉम्बस्फोटात जखमी झालेल्यांना वाचवण्यासाठी तेथील डॉक्टरांना प्रयत्नांची शर्थ करावी लागत आहे. इस्रायलच्या वेढय़ामुळे रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांची अवस्था अतिशय वाईट झालेली असल्यामुळे त्यांच्यासमोरील आव्हान अधिक वाढले आहे. रुग्णालयाच्या जमिनीवर, भूल न देता जखमींवर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली आहे.या स्फोटामुळे गाझामधील युद्धबळींची संख्या वाढून किमान ३,२०० झाली आहे, जखमींची संख्या ११,००० पेक्षा जास्त आहे. तसेच अन्य १,२०० लोक ढिगाऱ्यांखाली जखमी किंवा मृतावस्थेत असल्याचा अंदाज आहे. तर इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यात १,४०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. 

दुसरीकडे, हा स्फोट कोणी घडवून आणला यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. इस्रायलच्या हवाई हल्ल्यांनीच हा स्फोट झाल्याचा आरोप हमासने केला. मात्र इस्रायलने तातडीने हा आरोप फेटाळून लावला. ‘इस्लामिक जिहाद’ या पॅलेस्टिनी अतिरेकी संघटनेने डागलेले रॉकेट दिशा भरकटून रुग्णालयावर आदळले असा दावा इस्रायलच्या सैन्याकडून करण्यात आला. इस्रायलच्या हवाई हल्ल्याने हा स्फोट झाला असता तर घटनास्थळी मोठा खड्डा पडला असता. मात्र, असा कोणताही खड्डा तिथे पडलेला नाही असे लष्कराच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>अवयवदानाच्या संकल्पात महिला पुरुषांपेक्षा आघाडीवर; संकेतस्थळावरील आकडेवारीतील चित्र

स्फोट झालेल्या अल-अहली रुग्णालयात रुग्ण आणि युद्धामध्ये जखमी झालेल्या लोकांवर उपचार सुरू होते. त्याशिवाय अनेक सामान्य लोकांनी इस्रायलच्या हवाई हल्ल्यांपासून वाचण्यासाठी या रुग्णालयात आसरा घेतला होता. या स्फोटानंतर रुग्णवाहिका आणि खासगी वाहनांतून जवळपास ३५० जणांना गाझा शहरातील अल-शिफा या मुख्य रुग्णालयात हलवण्यात आले. या रुग्णालयात युद्धात जखमी झालेल्यांची आधीच गर्दी होती.रुग्णालयावरील स्फोटामुळे पश्चिम आशियाई देशांमध्ये संतापाची लाट उमटली आहे. इस्रायल आणि हमासदरम्यानच्या युद्धामुळे संपूर्ण प्रदेश युद्धाकडे ढकलला जात आहे, अशी भीती जॉर्डनचे परराष्ट्रमंत्री आयमान सफादी यांनी व्यक्त केली.

हल्ला धक्कादायक- मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा धक्का बसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. ‘अल-अहदी रुग्णालयात झालेल्या जीवितहानीमुळे अतिशय धक्का बसला आहे. पीडितांच्या कुटुंबीयांप्रति मनापासून संवेदना आणि जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना’ असे त्यांनी ‘एक्स’वर लिहिले आहे.

बायडेन यांचा पाठिंबा

जो बायडेन इस्रायलमध्ये पोहोचल्यानंतर पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. यावेळी माध्यमांसमोरच बायडेन यांनी ‘मी जे काही पाहिले आहे त्यानुसार, हा हल्ला अन्य कोणत्या तरी गटाने केला आहे, तुम्ही नाही’, असे नेतान्याहू यांना सांगितले.

हेही वाचा >>>शरद पवार यांचे नव्हे, तर पंतप्रधानांचे अदानींना संरक्षण; राहुल गांधी यांचा आरोप

संयुक्त राष्ट्रांचा ठराव अमेरिकेने रोखला

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये इस्रायल-हमास संघर्षांबाबत करण्यात आलेला ठराव स्थायी सदस्य असलेल्या अमेरिकेने नकाराधिकार वापरून रोखला. हमासच्या हल्ल्याच्या निषेध, सामान्य नागरिकांवरील हिंसेचा निषेध आणि गाझा पट्टीमध्ये जीवनावश्यक मदत त्वरित पोहोचविण्याचे आवाहन या ठरावात करण्यात आले होते. या ठरावाद्वारे युद्धविराम घेऊन नागरिकांना मदत व सुरक्षा पुरविण्याचा संयुक्त राष्ट्रांचा प्रयत्न आहे. सुरक्षा परिषदेच्या १५ सदस्यांपैकी १२ जणांनी ब्राझिलने मांडलेल्या या ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर रशिया आणि ब्रिटन तटस्थ राहिले. मात्र ठरावामध्ये इस्रायलच्या आत्मसंरक्षणाच्या हक्काचा उल्लेख नसल्याचे सांगत अमेरिकेने नकाराधिकार वापरला.

इस्रायल सैन्याकडून खुलासा

इस्रायलच्या लष्कराने बुधवारी सकाळी यासंबंधी खुलासा केला. सैन्य त्या भागात हवाई हल्ला करत नव्हते असे लष्कराचे प्रवक्ते रिअर अ‍ॅडमिरल डॅनियल हगारी यांनी सांगितले. हा स्फोट झाला तेव्हा, स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ६:५९ वाजता, ‘इस्लामिक जिहाद’ या पॅलेस्टिनी अतिरेकी गटाने जवळच्या दफनभूमीतून रॉकेट डागल्याची इस्रायलच्या रडारने नोंद केल्याची माहिती हगारी यांनी दिली.

रुग्णालयातील स्फोटामुळे मला तीव्र दु:ख आणि संताप झाला आहे. हमास सर्व पॅलेस्टिनी लोकांचे प्रतिनिधित्व करत नाही. हमासमुळे त्यांना केवळ त्रासच होत आहे. युद्धात सापडलेल्या निष्पाप पॅलेस्टिनींना मदत करण्यासाठी रुग्णालयांची क्षमता वाढवण्याचे मार्ग शोधण्याची गरज आहे. – जो बायडेन, अध्यक्ष, अमेरिका

बायडेन इस्रायलला ‘आता पुरे’ असे सांगू शकतात. तुम्ही गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी लोकांचा नरसंहार थांबवला पाहिजे. हे थांबवा. त्यांना मानवातावादी मदत मिळू द्या. – रियाद मन्सौर, पॅलेस्टाईनचे संयुक्त राष्ट्रांमधील राजदूत