scorecardresearch

राम सेतू खरंच अस्तित्वात होता का? केंद्रीय मंत्र्यांचं संसदेत मोठं विधान; म्हणाले, “अवशेषांवरून खात्रीने…!”

राम सेतुसंदर्भात अनेक दावे-प्रतिदावे सध्या सुरू आहेत. यावरून राजकीय चर्चा चालू असताना केंद्रानं संसदेत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

jitendra singh on ram setu
राम सेतु खरंच अस्तित्वात होता का? केंद्राची संसदेत महत्त्वपूर्ण माहिती (फोटो – नासा/ जपास स्पेस रिसर्च सेंटर)

गेल्या काही दिवसांपासून राम सेतुवरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेषत: अक्षय कुमारच्या राम सेतू चित्रपटानंतर यावरून मोठी चर्चा सुरू झाली आहे. रामायणात सांगितल्याप्रमाणे भगवान राम यांनी सीतेची सोडवणूक करण्यासाठी भारतातून श्रीलंकेला जाण्यासाठी हा पूल बांधला होता. तामिळनाडूच्या किनारपट्टीपासून थेट श्रीलंकेला जोडणारा हा पूल होता, असा दावा करण्यात येत आहे. मात्र, हा पूल खरंच अस्तित्वात होता की ही फक्त एक दंतकथा आहे, यावरून सगळी चर्चा सुरू असताना संसदेत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात यासंदर्भात मोठं विधान केलं आहे.

हरियाणातील भाजपा खासदार कार्तिकेय शर्मा यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. भारताच्या इतिहासातील गोष्टींची वैज्ञानिकदृष्ट्या चाचणी केली जाणार आहे का? असा प्रश्न उपस्थित करताना त्यांनी राम सेतुचाही उल्लेख केला होता. त्यासंदर्भात केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी उत्तरादाखल केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या कामाविषयी माहिती दिली. तसेच, आत्तापर्यंत समुद्रातल्या ज्या अवशेषांना राम सेतू म्हटलं जातंय, तो खरंच राम सेतू आहे का? यासंदर्भातही त्यांनी संसदेला माहिती दिली.

काय म्हणाले जितेंद्र सिंह?

जितेंद्र सिंह यांनी आपल्या उत्तरात तो राम सेतुच आहे की इतर कोणतं बांधकाम, याविषयी खात्रीशीर दावा करता येणं कठीण आहे, असं म्हटलं आहे. “राम सेतुसंदर्भात बोलायचं, तर त्यात आमच्या काही मर्यादा आहेत. कारण यासंदर्भातला इतिहास जवळपास १८ हजार वर्षांपूर्वीचा आहे. आणि इतिहासकालीन दाखल्यांचा विचार करता या पुलाची लांबी ५६ किलोमीटर इतकी आहे”, असं सिंह राज्यसभेत म्हणाले.

“मात्र, त्या ठिकाणी असणाऱ्या अवशेषांमध्ये एक प्रकारचं सातत्य आपल्याला दिसून येतं. त्यावरून आपल्याला नक्कीच काही अंदाज बांधता येतील”, असंही सिंह यांनी नमूद केलं.

“नेमकं सांगता येणं कठीण!”

दरम्यान, असं जरी असलं, तरी तिथे नेमका पूलच होता किंवा त्या ठिकाणी नेमकं कोणतं बांधकाम होतं, हे नेमकं सांगता येणं कठीण असल्याचं सिंह म्हणाले. “त्या ठिकाणी नेमकं कोणतं बांधकाम होतं हे नेमकं सांगता येणं कठीण आहे. पण तिथे काही प्रत्यक्ष किंवा काही अप्रत्यक्ष खुणांवरून आणि अवशेषांवरून मात्र, असं म्हणता येईल की तिथे एक बांधकाम होतं”, असं सिंह यांनी आपल्या उत्तरात नमूद केलं आहे.

विश्लेषण : अक्षय कुमारचा ‘राम सेतु’ म्हणजे इतिहास, पौराणिक कथा, आणि वाद यांना जोडणारा एकमेव दुवा

दरम्यान, जितेंद्र सिंह यांनी यासंदर्भात दिलेलं उत्तर संदिग्ध असून त्यातून कोणताही अर्थबोध होत नसल्याचं म्हटलं जात आहे. यावरून संभ्रम निर्माण झाल्याची स्थिती असून काहींनी याचा अर्थ तिथे राम सेतू असल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचं सरकारचं म्हणणं असल्याचा निष्कर्ष काढला आहे. तर काहींच्या मते, तिथे राम सेतू होता, याची चिन्ह दिसल्याचा सरकारचा दावा आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-12-2022 at 08:39 IST

संबंधित बातम्या