Donald Trump Announced Tariffs: दक्षिण कोरिया आणि जपानवर रेसिप्रोकल टॅरिफ अर्थात आयात शुल्क लागू केल्यानंतर या यादीत आणखी १२ देशांची भर ट्रम्प यांनी घातली आहे. त्यामुळे आता एकूण १४ देशांवर डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्याने रेसिप्रोकल टॅरिफ लागू केलं आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सोमवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी BRICS देशांना अमेरिकाविरोधी भूमिका घेतल्यास मोठ्या आर्थिक भुर्दंडाचा इशारा दिला होता. त्यानंतर आता अमेरिकन सरकारकडून ही घोषणा करण्यात आली आहे.
भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी रात्री डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण कोरिया व जपान या देशांवर टॅरिफ लागू केले. या नव्या निर्णयावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झालीच होती की या निर्णयाच्या काही वेळातच ट्रम्प यांनी आणखी १२ देशांची यादी जाहीर केली. या यादीतील देशांवर ट्रम्प यांनी लागू केलेल्या टॅरिफमध्ये सर्वाधिक कर तब्बल ४० टक्के इतका आहे. म्यानमार व लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक या दोन देशांवर सर्वाधिक कर लागू करण्यात आला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची पत्र पोहोचली!
काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत:च कर लागू करण्यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर पत्रे विविध देशांना पाठवली जातील, असं जाहीर केलं होतं. त्यानुसार या १४ देशांना नव्या टॅरिफ दरांसंदर्भात पत्र पाठवली आहेत. यासंदर्भात ट्रम्प यांनी Truth Social च्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. मोठ्या प्रमाणावर ही पत्र पाठवली जात असल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
दरम्यान, यासोबतच ट्रम्प यांनी या देशांना कोणत्याही आक्रमक भूमिकेबाबत इशाराही दिला आहे. “जर कोणत्याही कारणास्तव तुम्ही तुमच्याकडून आकारल्या जाणाऱ्या टॅरिफमध्ये वाढ केली, तर जी काही वाढ तुम्ही कराल, तेवढीच वाढ अमेरिकेकडून लागू करण्यात येणाऱ्या टॅरिफमध्येही केली जाईल”, असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे.
हे नवे दर म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेसाठी अन्यायकारक ठरलेल्या टॅरिफ दरांमध्ये सुधारणा करण्याचा पर्याय असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. “अमेरिकेकडून आकारण्यात येणाऱ्या आणि अमेरिकेवर लादण्यात येणाऱ्या टॅरिफमधील तफावत ही आमच्या अर्थव्यवस्थेला आणि आमच्या राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धक्का आहे”, असंही त्यांनी म्हटलं आहे.
वाचा कोणत्या देशांवर किती टॅरिफ आकारले?
१. म्यानमार – ४० टक्के
२. लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक – ४० टक्के
३. कम्बोडिया – ३६ टक्के
४. थायलंड – ३६ टक्के
५. बांगलादेश – ३५ टक्के
६. रिपब्लिक ऑफ सर्बिया – ३५ टक्के
७. इंडोनेशिया – ३२ टक्के
८. दक्षिण आफ्रिका – ३० टक्के
९. बोस्निया अँड हर्झेगोविना – ३० टक्के
१०. जपान – २५ टक्के
११. दक्षिण कोरिया – २५ टक्के
१२. मलेशिया – २५ टक्के
१३. कझाकिस्तान – २५ टक्के
१४. रिपब्लिक ऑफ ट्युनिशिया – २५ टक्के
डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्याने जाहीर केलेल्या रेसिप्रोकल टॅरिफमध्ये दक्षिण कोरियावर लागू केलेले दर हे २ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या दरांइतकेच म्हणजेच २५ टक्के इतके आहेत. जपानवरील दर १ टक्क्याने वाढवण्यात आले आहेत.