ट्रम्प यांची प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर आगपाखड

दृक्श्राव्य माध्यमांचे प्रतिनिधी अप्रामाणिक, दगलबाज आणि खोटारडे आहेत, अशी आगपाखड अमेरिकेचे नवनियुक्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. विशेष म्हणजे त्यांनी ही टीका पत्रकारांना खास निमंत्रण देऊन बोलावलेल्या बैठकीत केली.

अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर आणि पदग्रहणास अद्याप अवधी असताना ट्रम्प यांनी टेलिव्हिजन वाहिनींच्या पत्रकारांना आणि व्यवस्थापनातील उच्चपदस्थांना न्यूयॉर्क येथे खास बैठकीसाठी निमंत्रित केले होते. त्यात एबीसी न्यूजचे वृत्तनिवेदक जॉर्ज स्टिफनोपोलस आणि डेव्हिड मीर, सीएनएनचे वुल्फ ब्लिट्झर आणि एरिन बर्नेट, एबीसीच्या प्रतिनिधी मार्था राद्दाझ तसेच सीएनएन वर्ल्डवाइडचे अध्यक्ष जेफ झुकर, एनबीसी न्यूजच्या अध्यक्ष डेबोरा टर्नेस, एमएसएनबीसीचे अध्यक्ष फिल ग्रिफिन, एबीसी न्यूजचे अध्यक्ष जेम्स गोल्डस्टन यांच्यासह फॉक्स न्यूजचे उच्चपदस्थ बिल शाइन, जॅक अ‍ॅबर्नेथी, जे वॉलेस आणि सुझान स्कॉट यांचा समावेश होता. या सर्वाच्या मनात नव्या प्रशासनाशी कसा संवाद साधायचा याच्या कल्पना होत्या. मात्र ट्रम्प यांनी त्याला छेद देत थेट आक्रमक भूमिका घेतली असे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सांगितले. निवडणुकीदरम्यान अमेरिकी टेलिव्हिजन वाहिन्यांचे ट्रम्प यांच्यासंबंधी वार्ताकन पूर्वग्रहदूषित होते. त्यांनी निखालस खोटय़ा गोष्टी दाखवल्या आणि जनमताचा खरा कौल जाणून घेण्यात प्रसारमाध्यमे अपयशी ठरली, असा ट्रम्प यांच्या बोलण्याचा सूर होता.

ट्रम्प वाहिन्यांच्या प्रतिनिधींचा उल्लेख वारंवार अप्रामाणिक, कपटी, दगलबाज आणि खोटारडे असा करत होते, असे द वॉशिंग्टन पोस्ट आणि अन्य प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेच्या प्रमुख केल्यान कॉनवे यांनी म्हटले, की हे सगळे साफ खोटे आहे. तसे काही घडलेले नाही. ही बैठक काही गुप्त किंवा अनौपचारिक नव्हती. त्यामुळे जे कोणी हे आरोप करत आहेत त्यांनी बोलण्यापूर्वी विचार करावा.