अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि वादांचे नाते फार जुने आहे. राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरही वादग्रस्त प्रकरणांनी त्यांचा पिच्छा काही सोडलेला नाही. त्यांच्या काही निर्णयांवर जगभरातून अनेकदा टीकाही होते. आता ट्रम्प यांच्या नावावर असलेल्या वादग्रस्त प्रकरणांच्या यादीत एका नव्या परंतु अनोख्या गोष्टीची भर पडलीये. अमेरिकेत सोमवारी खग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळाले. यानिमित्ताने बऱ्याच काळानंतर सूर्याभोवती असलेल्या वातावरणाचा (कोरोना) अभ्यास करण्याची उत्तम संधी प्राप्त होणार असल्यामुळे अमेरिकी शास्त्रज्ञांनी पूर्ण तयारी केली होती. मात्र, त्याचवेळी हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये, अशी सूचनाही तज्ज्ञांकडून करण्यात आली होती. चष्मा न वापरता सूर्यग्रहण पाहिल्यास डोळ्यांना इजा होऊन अंधत्व येण्याची शक्यता असते, असे तज्ज्ञांकडून अनेकदा सांगण्यात येते. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी त्यांच्या नेहमीच्या बेदरकार वृत्तीला साजेसे वर्तन करून एकप्रकारे या तज्ज्ञांना वाकुल्या दाखवल्या.

https://twitter.com/ferrariforbes/status/899684510010363905

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांनी सोमवारी व्हाईट हाऊसच्या बाल्कनीतून पत्नी मेलानिया ट्रम्प आणि मुलगा बॅरॉन यांच्यासोबत सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद लुटला. यावेळी तज्ज्ञांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करत मेलानिया आणि बॅरॉन यांनी सूर्यग्रहण पाहण्यापूर्वी डोळ्यांवर चष्मा घातला. मात्र, ट्रम्प यांनी अतिउत्साहाच्या भरात थेट सूर्याकडे पाहिले. त्यांनी तब्बल तीनवेळा हे धाडस केले. विशेष म्हणजे त्या ठिकाणी उभ्या असणाऱ्या समर्थकांसमोर ते आपण उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहत असल्याची प्रौढी मिरवत होते. थोड्या वेळानंतर ट्रम्प यांनी डोळ्यांवर चष्मा चढवूनही सूर्यग्रहण पाहिले. मात्र, त्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी अतिरेकी आणि निरर्थक साहस करणाऱ्या ट्रम्प यांची खिल्ली उडवली.