BBC DG News CEO Resignations : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणाचे दोन वेगवेगळे भाग एकत्र जोडून दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनवर (BBC) मोठ्या प्रमाणात टीका झाली. ट्रम्प यांच्या भाषणाच्या संपादनावरून वाद निर्माण झाल्यानंतर अखेर बीबीसीचे महासंचालक टिम डेव्ही आणि वत्त प्रमुख डेबोरा टर्नेस यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त समोर आलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणावरून वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर रविवारी बीबीसीच्या दोन वरिष्ठांनी राजीनामा दिला. याबाबत बीबीसीने सांगितलं की, ‘महासंचालक (डीजी) टिम डेव्ही आणि न्यूज डिव्हिजनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डेबोरा टर्नेस यांनी रविवारी आपले राजीनामे दिल्याचं जाहीर केलं आहे. या संदर्भातील वृत्त जनसत्ताने दिलं आहे.

बीबीसीच्या एका माहितीपटासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचं भाषण संपादित करण्यात आलं होतं. त्यामध्ये ज्या पद्धतीने भाषण संपादित करण्यात आलं, ते दिशाभूल करणारं होतं, असा आरोप झाला होता. ६ जानेवारी २०२१ रोजी वॉशिंग्टनमधील कॅपिटल हिलवर निदर्शनापूर्वी ट्रम्प यांनी एक भाषण दिलं होतं. हे भाषण संपादित करताना भाषणातील काही भाग कट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. यावरून टीका झाली होती आणि नव्या वादाला तोंड फुटलं होतं.

कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात डेव्ही यांनी म्हटलं की झालेल्या चुकीबाबत आपण पूर्णपणे जबाबदारी घेऊन राजीनामा देत आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी बीबीसीचे महासंचालक आणि वृत्तसेवा प्रमुख यांच्या राजीनामा देण्याच्या भूमिकेचं स्वागत करत दोघांवरही टीका केली.