Donald Trump threatens substantially raising tariff On India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे . ट्रम्प यांनी भारत हा रशियाकडून तेल खेरेदी करत असल्याच्या मुद्द्यावर ट्रूथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत धमकी दिली आहे.

“भारत फक्त मोठ्या प्रमाणात रशियाकडून तेल खरेदीच करत नाही, तर त्यानंतर ते विकत घेतलेल्या तेलाचा बराचसा भाग मोठ्या नफ्याच्या बदल्यात खुल्या बाजारात विकत आहेत. रशियन वॉर मशिनमुळे युक्रेनमध्ये किती लोक मृत्यूमुखी पडत आहेत याबद्दल त्यांना कसलीही फिकीर नाही,” असे डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

तसेच ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये मोठी धमकी देखील दिली आहे. “यामुळे, मी भारताकडून अमेरिकेला दिल्या जाणाऱ्या टॅरिफमध्ये लक्षणीय रीतीने वाढ करणार आहे,” असे ट्रम्प म्हणाले आहेत. मात्र यावेळी त्यांनी ही नवीन वाढ कोणत्या स्वरूपात असेल याबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही.

काही दिवसांपूर्वी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली होती. तसेच रशियाकडून तेल खरेदी केली जात असल्याच्या कारणावरून भारतावर दंड लादण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३० जुलैला केली. हा दंड किती असेल याबद्दल कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नव्हती. यानंतर काही दिवसांतच त्यांनी पुन्हा पोस्ट करत भारताला धमकी दिली आहे.

भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने भारतावर टीका करत आहेत. यातच ट्रम्प यांनी दावा केला होता की, भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवणार असल्याचे त्यांच्या कानावर आले आहे. मात्र, एएनआय या वृत्तसंस्थेला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय तेल कंपन्यांची रशियाकडून तेल खरेदी चालूच आहे. त्यांच्या पुरवठ्याचे निर्णय किंमत, कच्च्या तेलाचा दर्जा, इन्व्हेंटरीज, लॉजिस्टिक्स आणि इतर आर्थिक घटकांवर अवलंबून असतात, असे सूत्रांनी सांगितले होते.

“या आव्हानात्मक परिस्थितीत, ८५% सह कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबून असलेला जगातील तिसरा सर्वात मोठा इंधन ग्राहक म्हणून भारताने आंतरराष्ट्रीय नियमांचे पूर्णपणे पालन करून परवडणारे इंधन खरेदी करण्यासाठी धोरणात्मक पाऊल उचलले आहे”, असे सूत्रांनी सांगितल्याचे वृत्त एएनआयने दिले होते.