अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या फेब्रुवारी महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी ते गुजरातमधील साबरमती रिव्हरफ्रंटला भेट देतील अशी माहिती गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी बुधवारी दिली. उत्तर दिल्लीत शास्त्री नगरमध्ये निवडणूक प्रचारसभेमध्ये ते बोलत होते.

“संपूर्ण आशियामध्ये साबरमती नदी सर्वात स्वच्छ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे हे शक्य झाले. जपान आणि इस्रायलचे पंतप्रधान सुद्धा साबरमती रिव्हरफ्रंटवर आले होते. त्यांना सुद्धा नदीची स्वच्छता पाहून आश्चर्य वाटले” असे रुपानी म्हणाले. “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारतात येतील. तेव्हा, ते सुद्धा रिव्हरफ्रंटला भेट देतील”. ट्रम्प नेमके कधी भारतात येणार ते रुपानी यांनी स्पष्ट केलेले नाही.

२४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान ट्रम्प भारतात येण्याची शक्यता आहे. राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतरचा डोनाल्ड ट्रम्प यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. मागच्यावर्षी भारताने प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ट्रम्प यांना निमंत्रण दिले होते. पण त्यावेळी त्यांना शक्य झाले नाही.