Donald Trump Property: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाचा कार्यभार स्वीकारताच अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली. जगातल्या अनेक देशांवर अव्वाच्या सव्वा टॅरिफ लागू करणे किंवा अमेरिकेतील बेकायदा स्थलांतरितांना मायदेशी परत पाठवण्याचा निर्णयही त्यातलेच. पण एकीकडे हे निर्णय घेत असताना दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून त्यांची वैयक्तिक संपत्तीही वेगाने वाढवण्यास सुरुवात केली. गेल्या सात महिन्यांत डोनाल्ड ट्रम्प यांनी १०० मिलियन अमेरिकन डॉलर्सपेक्षाही जास्त गुंतवणूक करून अनेक क्षेत्रांतील शेअर्स खरेदी केले आहेत. या व्यवहारांची एकूण संख्या जवळपास ६००च्या वर आहे!

डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आत्तापर्यंत केलेल्या व्यवहारांबाबतची नवीन माहिती समोर आली असून त्यामधून हे आकडे स्पष्ट झाले आहेत. रॉयटर्सनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.

या वृत्तानुसार, २० जानेवारी रोजी ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. २१ जानेवारीपासून गेल्या सात महिन्यांत डोनाल्ड ट्रम्प यांनी तब्बल १०० मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजे भारतीय चलनात जवळपास ८७० कोटींचे बॉण्ड्स खरेदी केले आहेत. हे सगळे व्यवहार त्रयस्थ ट्रस्टकडून केले जात असल्याचा दावा जरी ट्रम्प यांनी केला असला, तरी शेवटी हा सगळा पैसा ट्रम्प यांच्याच मालकीचा असल्यामुळे त्यांनी सरकारच्या निर्णयाचा फायदा स्वत:साठी केल्याचा आरोपही होऊ लागला आहे.

कोणत्या बॉण्ड्समध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची गुंतवणूक?

डोनाल्ड ट्रम्प यांनी ही १०० मिलियन डॉलर्सची गुंतवणूक प्रामुख्याने अमेरिकेतील कॉर्पोरेट, स्थानिक पालिका आणि राज्य कर्ज रोख्यांमध्ये केली आहे. त्यात सिटीग्रुप, मॉर्गन स्टॅनले, वेल्स फर्गो, मेटा, क्वालकॉम, दी होम डेपोट, टी-मोबाईल यूएसए आणि युनायटेड हेल्थ ग्रुप या कंपन्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. याशिवाय अमेरिकेतील राज्ये, कौंटी, शिक्षण संस्था, नैसर्गिक वायू उत्पादक संस्था आणि इतर स्थानिक पालिकांकडून जारी करण्यात आलेल्या बॉण्ड्समध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून गुंतवणूक केली आहे.

फक्त निधी दुसरीकडे वळवण्यासाठी गुंतवणूक?

दरम्यान, ट्रम्प यांनी केलेली ही बॉण्ड्सची खरेदी म्हणजे फक्त त्यांची अतिरिक्त संपत्ती दुसरीकडे वळवण्याचा मार्ग असल्याचं मत अमेरिकेतील तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे. “राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यापैकी बहुतांश हिस्सा हा क्रिप्टोकरन्सी आणि ‘ट्रम्प मीडिया’ यामध्ये आहे. हे पाहता त्यांची ही गुंतवणूक अतिरिक्त संपत्ती इतर ठिकाणी वळवण्याचा पर्याय सोडून दुसरं काही वाटत नाही”, असं मत ऑक्सफर्ड इकोनॉमिक्सचे अमेरिकेतील तज्ज्ञ जॉन कॅनावान यांनी व्यक्त केलं.

डोनाल्ड ट्रम्प यांनी एकूण संपत्ती किती?

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीबाबत वेगवेगळी आकडेवारी समोर आली आहे. एकट्या २०२४ वर्षात डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीत तब्बल ६०० मिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी भर पडल्याचं सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट झालं होतं. त्यात क्रिप्टोकरन्सी, गोल्फ मालमत्ता, परवान्यांचे व्यवहार आणि इतर उद्योगांमधून जमा झालेल्या नफ्याचा समावेश होता. रॉयटर्सनं जाहीर केलेल्या अहवालानुसार डोनाल्ड ट्रम्प यांची एकूण संपत्त किमान १.६ बिलियन डॉलर्स इतकी आहे.