Donald Trump unveils surprise new tariffs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी अचानक एक कार्यकारी आदेश जारी करत अमेरिकेच्या अनेक व्यापारी भागीदार देशांवर नवीन टॅरिफ लावण्याची घोषणा केला आहे. या आदेशात हे टॅरिफ ७ ऑगस्टपासून लागू केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ज्यामध्ये ६८ देश आणि २७ देशांच्या युरोपियन युनियन (EU) साठी दर निश्चित केल आहेत, तसेच या यादीत नसलेल्या देशांवर बेसलाइन १० टक्के टॅरिफ लावण्यात येणार आहे.
अनेक देशांकडून व्यापार करार करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाबरोबर वाटाघाटी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, यादरम्यान ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरूवारी स्पष्ट केले होते की ते १ ऑगस्टच्या मुदतीचे काटेकोरपणे पालन करणार आहेत आणि जे देश त्यांच्या प्रशासनाबरोबर नवीन करार करू शकले नाहीत, त्या देशांवर १ ऑगस्टपासून टॅरिफ लादले जाईल.
हे नवीन दर हे अमेरिकेबरोबरच्या व्यापारातील असमतोल आणि प्रदेशातील इकॉनॉमिक प्रोफाइल्सच्या आधारावर निश्चित करण्यात आले आहेत, असे एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांने सांगितल्याचे वृत्तसंस्था एपीने म्हटले आहे.
दरम्यान यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, १ ऑगस्टची डेडलाईन ही अंतिम असेल आणि ती वाढवली जाणार नाही. ते म्हणाले होते की, “एक ऑगस्टची डेडलाइन ही १ ऑगस्टची पहिली डेडलाइन आहे – ती बदलणार नाही आणि ती वाढवली जाणार नाही. अमेरिकेसाठी एक मोठा दिवस!”
जुलै महिन्याच्या सुरूवातीला १ ऑगस्टची सुधारित डेडलाईन जाहीर करताना ही तारीख निश्चित आहे, पण १०० टक्के निश्चित नाही असे म्हटले होते.
ही निश्चित केलेली तारीख जवळ येऊ लागताच ट्रम्प यांनी अनेक देशांना औपचारिक पत्र पाठवली होती. ज्यामध्ये त्यांच्या देशांतील निर्यातींवर ऑगस्टमध्ये लावल्या जाणाऱ्या टॅरिफबद्दल माहिती देण्यात आली होती. यामधील बहुतेक आकडे हे बऱ्यापैकी २ एप्रिलला निश्चित केल्याप्रमाणेच होते.
एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला ट्रम्प यांनी घोषणा केली होती की अमेरिका जवळपास सर्व देशांमधून केल्या जाणाऱ्या आयातीवर सरसकट १० टक्के टॅरिफ लावेल, याबरोबरच डझनभर देशांच्या मालावर ५० टक्क्यांपर्यंत शुल्क लावले जाईल.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर देखील २५ टक्के टॅरिफ लावले आहे. यानंतर भारतात यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अमेरिकेने कॅनडावर २५ टक्क्यांवरून वाढवून टॅरिफ ३५ टक्के केले आहे.
कोणत्या देशावर किती टॅरिफ
- ४१ टक्के टॅरिफ – सीरिया
- ४० टक्के टॅरिफ – लाओस, म्यानमार
- ३९ टक्के टॅरिफ – स्वित्झर्लंड
- ३५ टक्के टॅरिफ – इराक, सर्बिया
- ३० टक्के टॅरिफ – अल्जेरिया, बोस्निया, लीबिया, दक्षिण आफ्रिका
- २५ टक्के टॅरिफ – भारत, ब्रुनेई, कजाकिस्तान, माल्दोवा, ट्यूनीशिया
- २० टक्के टॅरिफ – बांगलादेश, श्रीलंका, तैवान, व्हियतनाम
- १९ टक्के टॅरिफ- पाकिस्तान, मलेशिया, इंडोनेशिया, कंबोडिया, फिलीपीन्स, थायलंड
- १८ टक्के टॅरिफ – निकारगुआ
- १५ टक्के टॅरिफ – इस्रायल, जपान, तुर्किये, नायजेरिया, घाना आणि इतर अनेक देश
- १० टक्के टॅरिफ – ब्राझिल, युके, फॉकलंड आयलंड्स