Donald Trump Tariff War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या टॅरिफ वॉरचे परिणाम जागतिक स्तरावर अनेक देशांमध्ये पाहायला मिळत आहेत. खुद्द अमेरिकेतही अनेक उद्योगांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धोरणाचा विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी वेगवेगळ्या देशांशी व्यापार करासंदर्भात करार केले आहेत. भारताशीही अशा करारासंदर्भात बोलणी चालू आहेत. मात्र, ही बोलणी पूर्ण होण्याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला २५ टक्के व्यापर कर लागू करण्याचा इशारा दिला आहे.
टॅरिफसंदर्भा द्विपक्षीय चर्चा
काही महिन्यांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातल्या देशांवर वेगवेगळ्या प्रमाणात टॅरिफ लागू केले होते. त्यावर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्याचं पाहायला मिळालं. अनेक देशांमधून यावर नकारात्मक प्रतिक्रिया आल्या. चीनने तर उलट अमेरिकेवरच १५० टक्के व्यापार कर लागू करत असल्याचं जाहीर केलं.
काही काळानंतर अमेरिका व चीनमध्ये व्यापार कराराबद्दल सहमती झाली व त्यांच्यातील टॅरिफ वॉर थांबलं. भारतानंही यासंदर्भात अमेरिकेशी व्यापार कराराबाबत बोलणी चालू केली आहेत. मात्र, त्याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांचं हे विधान आल्यामुळे चर्चेमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
डोनाल्ड ट्रम्प यांनी एका वाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये भारताला टॅरिफ लागू होण्याचा इशारा दिला आहे. “जर दोन्ही देशांमधील व्यापाराबाबतची बोलणी संपून दोन्ही बाजूंनी सहमती न झाल्यास भारतावर २५ टक्क्यांपर्यंत व्यापार कर लागू होऊ शकतो”, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.
“काय होईल हे आपल्याला पाहावं लागेल. भारत अमेरिकेचा खूप चांगला मित्र आहे. पण भारतानं गेल्या अनेक वर्षांत भारतानं अमेरिकेवर इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त व्यापार कर लागू केले आहेत. हे असं होऊ शकत नाही. व्यापार करारासंदर्भातली बोलणी व्यवस्थित चालू आहेत. मला वाटतं सगळ्यांसाठीच हा करार फायदेशीर ठरेल, पण अमेरिकेसाठी तो नक्कीच फायद्याचा असेल”, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
व्यापार कराराची सद्यस्थिती काय?
गेल्या अनेक महिन्यांपासून भारत व अमेरिकेत व्यापार करारासंदर्भात बोलणी चालू आहेत. मात्र, अद्याप दोन्ही बाजूंकडून त्यावर सहमती झालेली नाही. भारती बाजारपेठेत व्यापक प्रमाणात व्यापार करण्यासंदर्भात अमेरिकेकडून मागणी करण्यात आली असून त्यावर सहमती होऊ शकलेली नाही.
“भारतानं काही प्रमाणात त्यांच्या बाजारपेठा अमेरिकेसाठी खुल्या करण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली आहे. आमची त्यांच्याशी चर्चा चालू ठेवण्याची तयारी आहे. पण या चर्चांमधून साध्य करण्याच्या गोष्टींबद्दल भारताची नेमकी काय भूमिका आहे, हे पाहण्यासाठी आम्हाला त्यांच्याशी अधिक व्यापक चर्चा करण्याची गरज आहे”, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे व्यापारविषयक प्रतिनिधी जेमिसन ग्रीर यांनी सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत दिली.