इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेला संघर्ष आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. या संघर्षामुळे गेल्या दोन दिवसांत इराणमध्ये १३८ लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज पहाटे इस्रायलने इराणच्या अणु प्रकल्पाशी संबंधित ठिकाणांवर लढाऊ विमानांनी हल्ला केला आहे.
इस्रायली सैन्याने रविवारी सांगितले की त्यांनी तेहरानमधील इराणच्या संरक्षण मंत्रालयाच्या मुख्यालयाला लक्ष्य केले. यासह इस्रायली सैन्याने तेहरानभोवती इराणच्या अणु प्रकल्पाशी संबंधित ठिकाणांनाही लक्ष्य केले आहे.
दरम्यान रविवारी इराणवर झालेल्या हल्ल्यांशी अमेरिकेचा कोणताही संबंध नसल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला की, जर इराणने अमेरिकेवर कोणत्याही प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर अमेरिकन सैन्य त्याला पूर्ण ताकदीने उत्तर देईल.
याचबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, ते इराण आणि इस्रायलमध्ये सहजपणे करार करू शकतात आणि हा रक्तरंजित संघर्ष थांबवू शकतात.
सोशल ट्रुथवर केलेल्या एका पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले की, “इराणवरील हल्ल्याशी अमेरिकेचा काहीही संबंध नाही. जर इराणने आमच्यावर कोणत्याही प्रकारे हल्ला केला तर अमेरिकन सैन्य त्याला पूर्ण ताकदीने उत्तर देईल, तसेच इतिहासात यापूर्वी कधीही पाहिली नाही अशी कारवाई करेल.”
या पोस्टमध्ये पुढे, त्यांनी इराण आणि इस्रायलमध्ये करार करण्याचा प्रस्तावही दिला आहे. ते म्हणाले “आपण इराण आणि इस्रायलमध्ये सहजपणे करार करू शकतो आणि हा रक्तरंजित संघर्ष संपवू शकतो!”
दरम्यान रविवारी रात्री उशिरा इस्रायल आणि इराणने पुन्हा एकदा एकमेकांवर हल्ले केले आहेत. इस्रायलने जगातील सर्वात मोठ्या गॅस क्षेत्रावर हल्ला करत इराणविरुद्धची कारवाई आणखी तीव्र केली आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये आणखी मोठा संघर्ष होण्याची भीती निर्माण झाली आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सूचित केले आहे की, इराणला येत्या काळात ज्या प्रकारच्या लष्करी कारवायांचा सामना करावा लागणार आहे, त्या तुलनेत हे हल्ले अगदीच सौम्य आहेत.
इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी स्पष्ट केले आहे की, जर इस्रायलचे हे हल्ले सुरू राहिले तर ते अमेरिकेशी अणु चर्चेत सहभागी होणार नाहीत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी झालेल्या चर्चेत पेझेश्कियान म्हणाले की, इराण राजनैतिकतेला प्राधान्य देतो परंतु दबावाखाली अविवेकी मागण्या स्वीकारणार नाही.