Donald Trump Big Decision : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका लावला आहे. ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयांची जगात चर्चा होत आहे. एवढंच काय तर खुद्द अमेरिकेतही डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनेक निर्णयावर टीका होते. मात्र, तरीही ट्रम्प यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. विशेषत: बेकायदा स्थलांतरीतांची घरवापसी आणि इतर देशांवर टेरीफ लागू करण्याची भूमिका. सध्या या निर्णयांची चर्चा आहे. असं असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डीसी पोलिसांचा ताबा घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता या ठिकाणी शेकडो नॅशनल गार्ड तैनात करण्यात येणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय का घेतला? याबाबत अमेरिकेत देखील सवाल उपस्थित केले जात आहेत. ट्रम्प यांच्या नॅशनल गार्डच्या तैनातीवरील निर्णयाबाबत अनेकांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी का घेतला ‘हा’ निर्णय?

वॉशिंग्टनमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी शेकडो नॅशनल गार्ड्स तैनात करण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. शेकडो नॅशनल गार्ड्स तैनात केल्यानंतर त्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय त्यांचं कर्तव्य पार पाडण्याची अपेक्षा डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. तसेच नॅशनल गार्ड्सला कोणत्याही निर्बंधाशिवाय त्यांची कर्तव्ये पार पाडण्याची परवानगी दिली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डीसी पोलीस विभागाला थेट संघीय नियंत्रणाखाली आणण्यासाठी डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया होम रुल अ‍ॅक्ट लागू करण्याची घोषणा केल्यामुळे ट्रम्प यांचं हे मोठं पाऊल मानलं जात आहे. दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला ट्रम्प यांनी नॅशनल गार्डचा विस्तार लॉस एंजेलिसमध्ये केला होता. जिथे स्थानिक गव्हर्नरच्या विरोधाला न जुमानता संघीय एजन्सी तैनात करण्यात आल्या होत्या, त्याप्रमाणेच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.

ट्रम्प यांनी पत्रकारांना काय सांगितलं?

आज व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, “वॉशिंग्टन डीसीमध्ये कायदा, सुव्यवस्था आणि सार्वजनिक सुरक्षा पुनर्संचयित करण्यात मदत करण्यासाठी मी नॅशनल गार्ड तैनात करत आहे.” यावेळी ट्रम्प यांच्याबरोबर संरक्षण सचिव पीट हेगसेथ आणि प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामागील उद्देश शहरातील हिंसक गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणं हा असल्याचं म्हटलं जातं.