नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी घोषीत झाल्यानंतर ‘भाजप पूर्वीसारखा राहिला नाही’ अशी खंत व्यक्त करून राजीनामा देणारे भारतीय जनता पक्षाचे ‘भीष्म’ लालकृष्ण अडवाणी यांना उपरती झाली आहे. भाजपमध्ये झालेल्या परिवर्तनामुळे अतीव समाधान होत असल्याची भावना रविवारी राष्ट्रीय परिषदेत व्यक्त करून अडवाणींनी आपले मोदीप्रेम व्यक्त केला. मात्र, २००४ सारखे भ्रमात राहू नका; असा ‘सल्ला’ देण्यासही अडवाणी विसरले नाहीत.
मोदींच्या सव्वा तासाच्या घणाघाती भाषणानंतर अडवाणी यांनी भाजपच्या राष्ट्रीय परिषदेचा समारोप केला. अडवाणी म्हणाले की, देशात परिवर्तनाची लाट आली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला २७२ पेक्षाही जास्त जागा मिळतील. घवघवीत यश मिळविण्यासाठी अति-आत्मविश्वास दाखवू नका. २००४ मध्ये हाच अति-आत्मविश्वास नडला होता.
बरोब्बर अकरा महिन्यांपूर्वी दिल्लीतच झालेल्या राष्ट्रीय परिषदेत मोदींच्या भाषणाचा उल्लेखही न करणाऱ्या अडवाणी यांनी मोदींवर स्तुतिसुमने उधळून मोदींचे नेतृत्व अप्रत्यक्षपणे मान्य केले. अडवाणींचे समारोपाचे भाषण म्हणजे स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेत व्यक्त केलेले विचारच होते. स्वामी विवेकानंद यांचा दाखला देऊन अडवाणींनी रा.स्व.संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या आठवणी सांगितल्या. मोदींनी इंद्रधनुष्याच्या रूपकातून मांडलेल्या विकाससूत्राचे कौतुक केले. गुजरातमध्ये केलेल्या विकासकामांचाही उल्लेख त्यांनी आवर्जून केला.

“राष्ट्रवादाच्या नावाखाली डोकी वर काढू पाहणाऱ्या जातीयवादी आणि फॅसिस्ट शक्तींना सत्तेत येऊ देता कामा नय़े  कारण त्यांचे सत्तेत येणे देशाच्या हिताचे नाही़  देशाची एकता आणि अखंडता यासाठी बलिदान करण्याचा काँग्रेसचा आजवरचा इतिहास आह़े  परंतु इतर पक्षांना मात्र केवळ ‘द्वेषाचा इतिहास’ आह़े.”
मनीष तिवारी, केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री़