पीटीआय, मलप्पुरम (केरळ)

आयुर्वेद क्षेत्रातील भीष्माचार्य आणि कोट्टक्कल आर्य वैद्य शाळेचे (केएएस) व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पी. के. वॉरिअर यांचे शनिवारी येथे निधन झाले. ते १०० वर्षांचे होते. शनिवारी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आपल्या दीर्घ कारकीर्दीत डॉ. वॉरिअर यांनी जगभरातील असंख्य जणांवर उपचार केले. त्यांच्याकडून उपचार घेणाऱ्यांमध्ये देशाच्या माजी राष्ट्रपतींसह भारताच्या त्याचप्रमाणे परदेशातील माजी पंतप्रधानांचा समावेश आहे. डॉ. वॉरिअर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री पी. विजयन आणि राज्य विधानसभेचे अध्यक्ष एम. बी. राजेश, काँग्रेसचे नेते रमेश चेन्नीथला, राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज, भाजप प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी शोक व्यक्त केला आहे. आयुर्वेदाला लोकप्रियता मिळवून देण्यासाठी डॉ. वॉरिअर यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील, असे मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. डॉ. वॉरिअर यांना १९९९ मध्ये पद्मश्री, तर २०१० मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.