डॉ. सदानंद मोरे यांचा सबुरीचा सल्ला; कादंबरीचा नायक बदलू शकतो

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू कादंबरीचा पहिला भाग प्रकाशित झाला असून तो अंतिम निष्कर्ष नाही. त्यांच्या कादंबरीतील नायक हा जातिव्यवस्थेच्या विरोधी की बाजूचा हे आत्ताच ठरवता येणार नाही. यापूर्वीच्या अनेक लेखकांच्या कादंबऱ्यांतील नायक बदललेले आहेत. त्यामुळे आताच घाई नको, असा सल्ला मराठी साहित्यसंमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी दिला.
येथील बोरावके महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘साहित्य आणि इतर सामाजिक शास्त्रे’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते.
नेमाडे यांच्या नायक हा जातिव्यवस्थेचे समर्थन करणारा असल्याचा आक्षेप साहित्य क्षेत्रातील काही ज्येष्ठ साहित्यिकांकडून घेतला जात आहे. या पाश्र्वभूमीवर मोरे यांनी नेमाडे यांचे शुक्रवारी समर्थन केले. ते म्हणाले,ह्वनेमाडेंची कादंबरी अनेक वाचक वाचतात, कळली नाही तरी वाचतात. त्यामुळे हिंदू’ कशी वाचावी यावर आपण पूर्वी लिखाण केले. ही कादंबरी म्हणजे अंतिम निष्कर्ष नाही. सन १९३०पर्यंत मराठी साहित्यात नाटय़सृष्टी समृद्ध होती. मराठी रंगभूमी राजकीय राहिली. महात्मा गांधींविरुद्ध कादंबऱ्या लिहिल्या गेल्या, पण नाटके लिहिली गेली नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्याला अपवाद होता. नाटकांकरिता प्रेक्षक लागतो, गांधींविरोधात नाटक लिहिले गेले असते तर ते प्रेक्षकांनी पाहिले नसते किंवा पाहिले तर उधळून लावले असते. त्यामुळे नाटक लिहिण्याच्या भानगडीत कुणी पडले नाही. सावरकरांनी ‘संन्यस्थ खङ्ग’ हे नाटक लिहिले, पण ते चालले नाही. नंतर अनंत गद्रे यांनी या नाटकाच्या विरोधात पैसे देऊन परीक्षण लिहून आणले. नाटकाची वाईट चिरफाड करण्यात आली. त्यानंतर मात्र ते रंगभूमीवर चालले. साहित्यकृतीचे आकलन करताना प्रेरणा व परिणामांचा विचार केला जातो.ह्व
ज्ञानकोषकार केतकरांनी गांधींविरोधात कादंबऱ्या लिहिल्या. ‘ब्राह्मण कन्या’ व ‘गोंडवनातील प्रियंवदा’ या त्या दोन कादंबऱ्या होत. या दोन्ही कादंबऱ्या इतिहासकार वि. का.राजवाडेंना डोळय़ांसमोर ठेवून लिहिल्या होत्या. दोन्हीतही वैजनाथशास्त्री धुळेकर हे पात्र नायक आहे. त्यांच्या पहिल्या कादंबरीतील पात्र हे जातिव्यवस्थेचे समर्थन करणारे आहे. हे पात्र नवीन स्मृती तयार करणारे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले. पण वैजनाथ स्मृती ही काल्पनिक आहे. ती केतकरांनी लिहिली. नंतर त्यांच्या कादंबरीतील नायक बदलला व तो स्त्रीप्रधान झाला. नंतरच्या कादंबरीतील पात्र हे जातिव्यवस्थेच्या विरोधात होते. केतकर बदलतात तर मग नेमाडे यांनी का बदलू नये, असा सवाल डॉ. मोरे यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr sadanand more comment on hindu novel
First published on: 23-01-2016 at 00:02 IST