China On India Ties : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारी तणाव कमालीचा वाढला आहे. यादरम्यान गुरूवारी चीनच्या परराष्ट्र् मंत्रलयाने चीन आणि भारत यांच्या संबंधांबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे. चीन आणि भारत हे महत्त्वाचे विकसनशील देश आहेत आणि ग्लोबल साऊथ मधील महत्त्वपूर्ण सदस्य आहेत. याबरोबरच भागिदार म्हणून ड्रॅगन आणि हत्ती यांच्यातील सहकार्य एकमेकांना यशस्वी होण्यासाठी मदत करत आहे, ही दोन्ही बाजूंसाठी योग्य निवड आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटल्याचे वृत्त ग्लोबल टाईम्सने दिले आहे.

बिजिंग हे नव्याने समोर येत असलेल्या नवी दिल्लीबरोबरच्या द्विपक्षीय संबंधांना कसे पाहते आणि जागतिक स्तरावर दोन्ही देश एकत्र येऊन कसे काम करू शकतात याबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जिआन हे बोलत होते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय मालावर ५० टक्के शुल्क लादण्याची धमकी दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी BRICS देशांकडे मोर्चा वळवला आहे, विशेषतः चीनकडे. यामुळे भारत आणि चीन या देशांमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये बदल पाहायला मिळत आहेत.

“दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये झालेल्या महत्त्वाच्या समान समजूतींवर काम करण्यासाठी, परस्परांमधील राजकीय विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी, देवाणघेवाण आणि एकमेकांशी सहकार्य वाढवण्यासाठी, मोठे ध्येय लक्षात घेऊन मतभेद योग्य पद्धतीने हातळण्यासाठी, भारत आणि चीन संबंधांचा स्थिर आणि कणखर विकासाला प्रोत्साहन देत शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनसारख्या बहुपक्षीय व्यासपीठांवर सहकार्य आणि समन्वय मजबूत करण्यासाठी चीन भारताबरोबर काम करण्यास तयार आहे,” असे ग्लोबल टाईम्सने लिन यांच्या हवाल्याने म्हटले आहे.

भारत-अमेरिका यांच्यात असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच चीनला थेट विमान सेवा सुरु करण्याची घोषणा करू शकतात, ही घोषणा पुढील महिन्यात केली जाण्याची शक्यता आहे, असे वृत्त ब्लूमबर्गन या वृत्तसंस्थेने दिले आहे.

३१ ऑगस्ट रोजी होत असलेल्या शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन परिषदेसाठी मोदी सात वर्षांनंतर पहिल्यांदाच चीनला जाणार आहेत. यावेळी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची ते भेट घेणार आहेत, तेव्हा या कराराची औपचारिक घोषणा होऊ शकते, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.