संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओने सोमवारी ओदिशाच्या परीक्षण तळावरुन बंगालच्या उपसागरात ८०० किलोमीटर रेंज असलेले ‘निर्भय’ क्रूझ क्षेपणास्त्र डागले. पण काही मिनिटातच चाचणी रद्द करण्याचा निर्णय घेतला. “परीक्षण तळावरुन सकाळी १०.३० च्या सुमारास क्षेपणास्त्र डागण्यात आले पण क्षेपणास्त्रात तांत्रिक बिघाड उदभवल्याने आठ मिनिटात चाचणी रद्द करण्यात आली” असे सरकारी अधिकाऱ्याने हिंदुस्थान टाइम्सला सांगितले.

निर्भय हे मागच्या ३५ दिवसात डीआरडीओने डागलेले १० वे क्षेपणास्त्र आहे. सरासरी दर चार दिवसांनी क्षेपणास्त्र चाचणी सुरु आहे. पूर्व लडाख सीमेवर चीनने केलेली सैन्याची जमवाजमव आणि क्षेपणास्त्र तैनातीच्या पार्श्वभूमीवर भारताने नव्या पिढीच्या क्षेपणास्त्र विकासाच्या आणि तैनातीच्या कार्यक्रमाला गती दिली आहे. त्यामुळेच डीआरडीओकडून सतत क्षेपणास्त्र चाचण्या सुरु आहेत.

या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी सांगितले की, पुढच्या काही महिन्यात डीआरडीओ पुन्हा चाचणी करेल, त्यामुळे या क्षेपणास्त्राचा भारतीय लष्करात समावेशाचा मार्ग मोकळा होईल. सोमवारी निर्भय क्षेपणास्त्राची आठव्या फेरीची चाचणी करण्याआधी मर्यादीत प्रमाणत ही क्षेपणास्त्रे चीनला लागून असलेल्या सीमेवर पाठवण्यात आली आहेत.

निर्भय सबसॉनिक मिसाइल आहे. ०.७ माच असा या मिसाइलचा वेग आहे. निर्भय क्षेपणास्त्र जमिनीपासून १०० मीटर ते चार किलोमीटर अंतरावरुन उड्डाण करुन लक्ष्याचा वेध घेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. हे क्षेपणास्त्र ३०० किलो वजनाची स्फोटके वाहून नेऊ शकते. लडाख सीमावादाला सुरुवात झाल्यापासून चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने दीर्घ पल्ल्याची सॅम क्षेपणास्त्र तिबेट आणि शिनजियांगमध्ये तैनात केली आहेत. परिस्थिती चिघळलीच तर चीनला त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने सुद्धा सुपरसॉनिक ब्रह्मोस, सबसॉनिक निर्भय आणि आकाश क्षेपणास्त्राची तैनाती करुन ठेवली आहे.