भविष्यवेधी युद्धतंत्राचा विचार करून भारत आता यंत्रमानवाच्या रूपातील सैनिक तयार करणार आहे. निर्मनुष्य युद्धक्षमता वाढवण्यात यशस्वी ठरणाऱ्या देशांच्या पंक्तीत त्यामुळे आपल्या देशाला स्थान मिळणार आहे. संरक्षण संशोधन व विकास संस्था म्हणजे डीआरडीओच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प राबवला जाणार असून उच्च बुद्धिमत्ता क्षमता असलेले यंत्रमानव त्यासाठी विकसित करण्यात येणार आहेत. शत्रू व मित्र यातील फरक ओळखण्याची क्षमता त्यांच्यात तयार केली जाईल.
प्रत्यक्ष ताबा रेषेवर अवघड अशा युद्ध क्षेत्रात मानवी हानी मोठय़ा प्रमाणात होऊ नये यासाठी यंत्रमानवांचा वापर केला जाईल, यंत्रमानव सैनिकांच्या निर्मितीसाठी आम्ही काम सुरू केले आहे. आज जी प्रगती झालेली आहे त्यापेक्षाही जास्त क्षमतेची बुद्धिमत्ता आम्ही या यंत्रमानव सैनिकांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा नवीन कार्यक्रम आहे व अनेक प्रयोगशाळा त्यावर काम करीत आहेत, असे डीआरडीओचे प्रमुख अविनाश चंदर यांनी सांगितले.
आपल्या कारकीर्दीत आपण यंत्रमानवाच्या रूपातील सैनिक तयार करण्याच्या या प्रयोगाला प्राधान्य देणार आहोत असे सांगून ते म्हणाले की, निर्मनुष्य युद्धतंत्र भूमी व आकाशात यापुढे महत्त्वाचे ठरणार आहे. सुरुवातीला मानवी सैनिक यंत्रमानव सैनिकांना मदत करतील. पण नंतर ते स्वयंप्रज्ञेने शत्रू व मित्र ओळखू शकतील. जिथे मानव धाडस करू शकत नाहीत अशा ठिकाणी सध्या यंत्रमानवांचा वापर केला जातो आहे. बॉम्ब निकामी करण्यासाठी किंवा उच्च प्रारण क्षेत्रात यंत्रमानवांचा वापर केला जातो त्याचप्रमाणे युद्धभूमीवर मानवी हानी टाळण्यासाठी यंत्रमानवाचा वापर केला जाईल. सध्या आमच्याकडे असे तंत्र आहे ज्यात मानवी सैनिक यंत्रमानव सैनिकाला सूचना देईल व त्यावरून तो ओळखेल.
प्रत्यक्ष ताबा रेषेवर हे यंत्रमानव सैनिक तैनात केले जाऊ शकतील काय, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, नजीकच्या काळात हे शक्य आहे पण त्याला किमान दहा वर्षे लागतील. किमान पाच ते सहा देश यावर काम करीत आहेत, त्यांनीही यंत्र पूर्ण विकसित केलेले नाही, पण ते प्रगत अवस्थेत आहेत.