एपी, कोया : इराणने बुधवारी उत्तर भागातील इराणविरोधी कुर्दीश गटांवर ड्रोन हल्ले केले. इराणमध्ये हिजाबविरोधी निदर्शने होत असताना हे हल्ले करण्यात आले आहेत. कुर्दीश अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इराणी कुर्दीस्तानचे (केडीपीआय) सदस्य सोरान नूरी यांनी सांगितले, की बुधवारी पहाटे कोया येथे हे हल्ले करण्यात आले. कोयाचे नागरी संरक्षण प्रमुख आणि कुर्दीश ब्रिगेडियर जनरल गोरान अहमद यांनी सांगितले, की या हल्ल्यात दोन जण मृत्युमुखी आणि सात जण जखमी झाले. इराणमध्ये एका २२ वर्षीय पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कुर्दीश तरुणीच्या मृत्यूनंतर सुरू असलेल्या निदर्शनांना रोखण्यासाठी हे हल्ले करण्यात आल्याचे समजते. ‘केडीपीआय’ हा इराणमधील हा डावा सरकारविरोधी सशस्त्र गट आहे.

इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेसह काही प्रसारमाध्यमांनी सांगितले, की देशाच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड’ने उत्तर इराकमधील फुटीरतावादी गटाच्या काही अड्डय़ांना क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने लक्ष्य केले होते. कुर्दीश टेलिव्हिजन नेटवर्क ‘रुदाव’ने १५ जण जखमी झाल्याचे वृत्त दिले आहे. इराणी सरकारी वृत्तसंस्थेने रिव्होल्युशनरी गार्ड प्रमुख हसन हसनजादाने दिलेल्या माहितीनुसार वृत्त दिले आहे, की या निदर्शने आणि आंदोलनांत झालेल्या संघर्षांत १८५  बसिजी (इराणी नागरी सशस्त्र दल) चाकूहल्ल्यात जखमी झाले. पाच बसिजांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. नूरी यांनी सांगितले, की इराणी ड्रोनने कोयाच्या आसपासच्या लष्करी छावण्या, घरे, कार्यालये व इतर भागांना लक्ष्य केले. ते म्हणाले, की इराणचे हल्ले अजूनही सुरूच आहेत. इराणच्या निमलष्करी दलाच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड’ने शनिवारी आणि सोमवारी कुर्दीश गटांवर तोफ व ड्रोन हल्ले केले.

बळ अनावश्यक वापरू नये

संयुक्त राष्ट्र सरचिटणीस  इराणमध्ये पोलीस कोठडीत तरुणीच्या मृत्यूनंतर सुरू झालेले देशव्यापी निदर्शने थांबवण्यासाठी निदर्शकांवर बळाचा अनावश्यक वापर करू नये, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गुतेरेस यांनी बुधवारी केले. त्यांच्या प्रवक्त्याने सांगितले, की अधिकाऱ्यांनी महसा अमिनी या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी निष्पक्ष चौकशी करावी. १७ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या निदर्शनांचे लोण सुमारे ४६ शहरे, गावे आणि वस्त्यांत पसरले आहे. या आंदोलनातील हिंसाचारात आतापर्यंत ४१ आंदोलक, पोलिसांचा मृत्यू झाला आहे.