काही दिवसांपूर्वी शंकर मिश्रा नावाच्या एका तरुणाने एअर इंडिया फ्लाइटने न्यूयॉर्कहून दिल्लीला येत असताना एका सहप्रवासी महिलेच्या अंगावर लघुशंका केली होती. आरोपी मद्यधुंद अवस्थेत असताना हा प्रकार घडला होता. ही घटना ताजी असताना आता अमेरिकन एअरलाइन्समध्ये असाच प्रकार घडला आहे. न्यूयॉर्कहून नवी दिल्लीला येणाऱ्या अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने बसलेल्या ठिकाणीच लघुशंका केली आहे. यानंतर तो सहप्रवाशाच्या अंगावर पडला आहे.

संबंधित विमान दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. ‘पीटीआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, एए२९२ क्रमांकाच्या अमेरिकन एअरलाइन्स फ्लाइटने शुक्रवारी रात्री ९ वाजून १६ मिनिटांना न्यूयॉर्कहून उड्डाण केलं होतं. १४ तास २६ मिनिटांच्या प्रवासानंतर हे विमान शनिवारी रात्री १० वाजून १२ मिनिटांनी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं.

हेही वाचा- टॉपलेस होत रशियन महिलेचा विमानात धिंगाणा; कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न, सिगारेट ओढण्याची मागणी आणि…

आरोपी तरुण हा अमेरिकेतील एका विद्यापीठात शिकत असल्याची माहिती मिळत आहे. तो मद्यधुंद अवस्थेत झोपलेला असताना त्याने लघवी केली होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर आरोपीच्या शेजारी बसलेल्या सहप्रवाशाने फ्लाइट क्रूकडे याबाबतची तक्रार केली. यावेळी आरोपी सहप्रवाशाच्या अंगावर पडला. यानंतर संबंधित आरोपी विद्यार्थ्याने माफी मागितली.

हेही वाचा- “महिलेच्या अंगावर लघुशंका करणाऱ्या आरोपीकडून जबाबात वारंवार बदल”, पोलीस अधिकाऱ्याची माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीडित पुरुष या प्रकरणाची तक्रार करण्यास उत्सुक नव्हता. तथापि, फ्लाइट क्रूला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ला याची माहिती दिली. हे विमान दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर CISF च्या जवानांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.