उत्तर प्रदेशात एका व्यक्तीने दारुच्या नशेत कुत्र्याच्या पिल्लांची शेपटी आणि कान कापून खाल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दारुच्या नशेत असलेल्या आरोपीने चकना म्हणून पिल्लांची कापलेली शेपटी आणि कान मीठ लावून खाऊन टाकल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दोन्ही पिल्लं जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
फरिदपूर येथील बरेली जिल्ह्यात हा निर्घृण प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने एका पिल्लाचे कान आणि दुसऱ्याची शेपूट कापल्यानंतर दोघेही रक्तबंबाळ अवस्थेत पडले होते. आरोपीने दारुसोबत शेपटी आणि कान खाऊन टाकले. दोन्ही पिल्लांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुकेश वाल्मिकीने आपल्या मित्रासह मद्यप्रशान करत असताना हा निर्घृण प्रकार केला. प्राणीप्रेमी आणि पिपल फॉर अॅनिमल्स संघटनेचे सदस्य धीरज पाठव यांनी याप्रकऱणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.
वरिष्ठ पोलीस अधिक्षक अखिलेश चौरसिया यांनी याप्रकरणी चौकशी सुरु केली असून, आरोपींविरोधात कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.