आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. दारुच्या नशेत येथे एका व्यक्तीने बकऱ्याचा बळी देण्याऐवजी एका व्यक्तीचाच बळी दिलाय. पोलिसांनी या प्रकरणामध्ये आरोपीला अटक केली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरु केलाय. ही घटना १६ जानेवारी रोजी घडलीय. संक्रांतीच्या उत्सवादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या बकऱ्यांचा बळी देण्याच्या कार्यक्रमादरम्यान मंदिराच्या बाजूलाच ही घटना घडल्याचं सांगितलं जातं आहे.

इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार चलापती नावाच्या एका व्यक्तीला मंदिरात बकऱ्याचा बळी द्यायचा होता. मात्र बऱ्याचा बळी देण्यासाठी चलापति जेव्हा मंदिरात आला तेव्हा तो दारुच्या नशेत होते. पूजा झाल्यानंतर बळी देण्याची वेळ आली तेव्हा चलापतिने दारुच्या नशेत बकरा पकडून बसलेल्या सुरेश नावाच्या व्यक्तीचाच गळ्यावर तलावर ठेवली. इतरांनी चलापतिला रोखण्याआधीच त्याने सुरेशच्या मानेवरुन तलवार फिरवली होती.

काही क्षणांमध्ये मंदिरात बकरं कापण्याच्या जागी सुरेश रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मंदिरामधील इतरांनी तातडीने सुरेशला मदनपेले सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी प्रतत्न सुरु केले. मात्र रुग्णालयामध्ये नेत असतानाच वाटेतच सुरेशचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी सुरेशला मृतावस्थेतच रुग्णालयात आणल्याचं सांगितलं. चलापतिला पोलिसांनी अटक केली असून प्रकरणाची चौकशी सुरु केलीय. हा सर्व प्रकार ऐकून पोलीसही गोंधळून गेल्याचं स्थानिक सांगतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मदनपल्ले गावामध्ये स्थानिक लोक मागील अनेक वर्षांपासून यल्लमा देवीच्या मंदिरामध्ये बकऱ्यांचा बळी देतात. यावेळेसही संक्रांतीच्या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये बकऱ्यांचा बळी देण्यासाठी येथे मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. या प्रकरणामध्ये दारुच्या नशेत असणाऱ्या चलापतिला स्थानिकांनी पकडून ठेवलं आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलीस आता प्रत्यक्ष ही घटना पाहणारे साक्षीदार आणि इतर पुरावे गोळा करत आहेत.