विमानात भरपूर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या तसेच महिला सहप्रवाशावर हल्ला करणाऱ्या मद्यपीला इतर प्रवाशांनी खुर्चीलाच बांधून ठेवल्याची खळबळजनक घटना गुरुवारी अमेरिकेत उघडकीस आली आहे. आईसलँड ते न्यूयॉर्कदरम्यान प्रवास करणाऱ्या ४६ वर्षीय व्यक्तीला विमानात गोंधळ घातल्याप्रकरणी न्यूयॉर्कच्या जेएफ केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
फोर्बशी निगडित असलेले अँडी एलवूड त्याच विमानातून प्रवास करीत होते. त्यांनी प्रवाशाला बांधलेला फोटो काढून प्रसिद्ध केल्यानंतर एकच खळबळ उडाली.
भरपूर दारू प्यायल्यानंतर ही व्यक्ती विमानात गोंधळ घालू लागली. तसेच त्या व्यक्तीने एका महिला प्रवाशाला मारहाण करण्याचा प्रयत्न करून विमान कोसळणार असल्याचे ओरडू लागला. त्यामुळे विमान कर्मचाऱ्यांनी इतर प्रवाशांच्या मदतीने त्याला धरून खुर्चीतच बांधून ठेवले. या व्यक्तीचे नाव कळले नसून तो आईसलँडचा पासपोर्टधारक असल्याचे समजते. केनेडी विमानतळावर विमान उतरल्यानंतर काही वेळाने त्या प्रवाशाला पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे.