दिल्ली विद्यापीठाच्या प्राध्यापक नंदिनी सुंदर यांच्याविरोधात एका आदिवासी तरुणाच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदिनी सुंदर यांच्यासोबत जेएनयूतील प्राध्यापक अर्चना प्रसाद, विनीत तिवारी, कम्यूनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) नेते संजय पराटे यांचाही आरोपींमध्ये समावेश आहे.
सशस्त्र नक्षलवाद्यांनी ४ नोव्हेंबररोजी छत्तीसगडमधील नक्षलवादग्रस्त सुकमा जिल्ह्यातील नामा गावात राहणा-या शामनाथ बाघेल यांची राहत्या घराजवळ हत्या केली होती. बाघेल आणि त्यांचे सहकारी एप्रिलपासून गावात सुरु असलेल्या नक्षलवादी कारवायांविरोधात आंदोलन करत होते. बाघेला यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. नंदिनी सुंदर यांच्याविरोधात तक्रार केल्याने आम्हाला नक्षलवाद्यांकडून धमक्या येत होत्या असे त्यांच्या पत्नीने तक्रारीत म्हटले आहे. या आधारे पोलिसांनी नंदिनी सुंदर आणि अन्य आरोपींविरोधात गुन्हेगारी कट रचणे, हत्या, दंगल घडवणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. नंदिनी सुंदर यांनी गावात रिचा केशव असे खोट नाव सांगून प्रवेश केला. नंदिनी सुंदर, प्रसाद या मंडळींनी गावातील लोकांना सरकारविरोधात भडकवण्याचा प्रयत्न केला. तसेच ग्रामस्थांनी नक्षलवाद्यांना मदत करावी यासाठी दबावही टाकला होता असा गंभीर आरोपही केला जात आहे. नक्षलवादी कारवायांना विरोध करु नये यासाठी सुंदर यांनी धमकावल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
नंदिनी सुंदर आणि त्यांच्या सहका-यांविरोधात गुन्हा दाखल झाल्यावर छत्तीसगडमधील बस्तर पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे. पोलिसांनी दिल्ली विद्यापीठ आणि जेएनयू प्रशासनाला पत्र पाठवून त्यांच्या प्राध्यापकांची चौकशी करु असे सांगितले आहे.